राजगुरुनगर (पुणे) : हिजवंडी आयटी पार्क फेजमधील एका कंपनीत नोकरी करणारा सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. एबीसी जंक्शन आकुर्डी, मूळ रा. शिडी ) हा तरुण २८ जुलैपासून बेपत्ता झाला होता. पुणे-नाशिक महामार्गावर (दि. ६ रोजी ) खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्याचा खून झाल्याचे डॉक्टराच्या तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. खून कोणी व का केला याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. याप्रकरणी, खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक बिरूदेव काबुगडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
सौरभ पाटील आठवडाभरापासून बेपत्ता होता. त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने नातेवाईक संदीप सोनवणे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दिली होती. त्याची दुचाकी होलेवाडी (ता. खेड) या परिसरात एका शेतात आढळून आली होती. लगतच विहिरीच्या कठड्यावर त्याच्या गाडीची चावी पोलिसांना मिळाली. मात्र, त्याचा कुठेही शोध लागत नव्हता. पुणे नाशिक महामार्गावरील जुन्या खेड घाटात सांडभोरवाडी गावचे हद्दीत वनविभागाचे उतरत्या झाडाझुडपांचे वाढलेल्या गवताचे रानात सौरभ पाटील यांचा कुजलेल्या अवस्थेत मुत्युदेह मिळून आला.
खेड पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी पथके तयार केली आहेत. त्यानूसार संशयास्पद मृत्यूचा शोध सुरू केला आहे. असे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.