पुणे : ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला सामाजिक तणाव घालविणारी कृती रविवार गणेश पेठेतील मदर्शाला मशीद व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टकडून मंगळवारी झाली. मशिदीच्या दारावरून जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या पालखीचे मशिदीच्या विश्वस्तांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले, तर स्वामी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे पुष्पहार घालून प्रतिसाद दिला. गळामिठी घेत, मग त्यांनी आनंद व्यक्त केला.
दर अक्षय तृतीयेला स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात येते. मंगळवारी सकाळी ११ वाजता मंदिरात पूजा करून, पालखीने प्रस्थान केले. पालखीसमवेत ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड, नरेंद्र किराड, केदार नाझरे, कुणाल जाधव, संतोष भिलारे, पुष्कर नाईक, अक्षय कांबळे, महेश अरणे, सागर टिळेकर व अन्य पदाधिकारी होते. पालखीमार्ग रविवार गणेश पेठेतील मदर्शाला मशिदीवरून जातो. मशिदीवरील भोंगे काढले नाहीत, तर समोरच हनुमान चालीसा लावण्याचा इशारा मनसेने दिल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरणात मंगळवारी बराच तणाव होता.
पालखी मदर्शाला मशिदीसमोर आल्यावर मशिदीमधून अनेक पदाधिकारी बाहेर आले. त्यांनी पालखी थांबविली व स्वत: पुष्पहार अर्पण करून पालखीचे, पादुकांचे स्वागत केले. यासीन शेख, अजीज खान, रिजवान शिकलीकर, राजू शेख व अन्य पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्यात समावेश होता. सर्वांनी पालखीला सन्मान दिला व ट्रस्टींचे स्वागतही केले. प्रत्युत्तरादाखल ट्रस्टींनीही मशिदीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रसाद म्हणून स्वामींची शाल दिली व त्यांचे सत्कारही केला. त्यानंतर, पालखीने तिथून प्रस्थान केले.