पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली. पुणेकरांनी अतिशय उत्साहात मेट्रोने प्रवास केल्याचे दिसून येत होते. त्यातच पिंपरी चिंचवडमधील भोसरी स्टेशनच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला होता. या भागातील भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आता शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावात चूक झाल्याचे महामेट्रोच्या प्रकल्प अहवालातून समोर आले आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या बुधवार पेठेत मेट्रो स्थानक तयार होणार होते. त्यानुसार महामेट्रोच्या प्रकल्प अहवालात बुधवार पेठ मेट्रो स्टेशन नाव देण्यात आले. मात्र जागेअभावी बुधवार पेठेत स्टेशन तयार करणं अवघड होते. त्यामुळे ते हलवून कसबा पेठेत साततोटी पोलीस चौकीजवळ स्थानकाचे काम सुरु करण्यात आले. परंतु अहवालात मात्र स्थानकाच्या नावाचा बदल केला नाही. दोन्ही पेठांमध्ये बरेच अंतर असल्याने या स्थानकाचे नाव चुकीचं असल्याचे समोर आले आहे. भोसरी स्थानकाच्या नावावरूनही गोंधळ भोसरी स्थानकामुळे प्रवाशांमध्ये विशेषत: गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. त्या स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास १० किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येणार आहेत. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे, परंतु नवीन माणसाचा स्टेशनच्या नावावरून गोंधळ होण्याची शकयता आहे.
तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रो मिळाली
२०१४ साली पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. तर २०१६ साली मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव मिळाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य नागरिक मेट्रोने प्रवास करण्यासाठी अजूनही येत आहेत. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यातच मेट्रो प्रशासनाने अशी चुकीची कामे करू नये असे नागरिकांनी सांगितले आहे.