पुणे : हिंदू राष्ट्रसेना पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर सोमवारी रात्री ससून रुग्णालयात शिरून ५ जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. ताे फसल्यानंतर त्यांनी धारदार हत्यारांनी हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता बंडगार्डन पोलिसांची २ पथके, हडपसर पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्ल्यातील तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्याआधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी सागर ओव्हाळ, बाळा ओव्हळ, इनामदार असे तीन संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. याबाबत तुषार नामदेवराव हंबीर (वय ३५, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, गुंड तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचे काम करत असून तो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्याला हाडांचा व स्नायू दुखण्याचा त्रास असल्याने वारंवार ससून रुग्णालयात न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे यावे लागते. त्याला २५ ऑगस्ट रोजी ससून रूग्णालयातील इन्फोसिस बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर दाखल केले होते. सोमवारी रात्री ५ जणांचे टोळके रुग्णालयात हत्यारासह शिरले. टोळक्यातील एकाने पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र पिस्तुलातून गोळीच फायर झाली नाही. त्यानंतर ते हंबीरवर तलवार, कोयत्याने वार करत असताना तेथे असलेले गार्ड बागड व हंबीर यांचा मेव्हणा मध्ये पडला. या वेळी त्यांच्या हातावर वार झाले. त्या ठिकाणी गोंधळ उडाल्याने व पोलीस गार्डने रायफल काढल्याने पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले.
ससूनमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ससून रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था असताना संशयित आरोपी हत्यारे घेऊन आत गेलेच कसे? त्यांना कोणी अडवले नाही का? या वेळी सुरक्षा व्यवस्था काय करत होती, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचबरोबर ससूनमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
''हंबीर हा एका गुन्ह्यात न्यायालयीन बंदीत आहे. त्याला मणक्याचा तसेच स्नायूंचा त्रास असल्याने न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे पाठवावे लागते. त्याला चालण्याचा त्रास होत असल्याने २५ ऑगस्ट रोजी तो ससून रुग्णालयात उपचारासाठी गेला असताना त्याला डॉक्टरांनी दाखल करून घेतले होते. - राणी भोसले, पोलीस अधीक्षक, येरवडा कारागृह''