पुणे : सध्या जाॅबचे स्वरूप बदलत आहे. सध्या जे शिक्षण मुले घेत आहेत, त्यापैकी एक तृतीयांश मुलांना सध्या अस्तित्वात नसलेले, परंतु भविष्यात नवीन तयार हाेणारे जाॅब करावे लागतील. आज ‘एआय’मुळे नोकऱ्या जातील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही नाेकऱ्या गेल्या तरी नवीन नाेकऱ्या मात्र निर्माण हाेतील. जाॅबचे स्वरूप बदलत असून, त्यानुसार आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२४ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला.
डॉ. माशेलकर म्हणाले, आपल्या समाजात आज शिक्षकांना प्रतिष्ठा दिली जात नाही, हे धोक्याचे लक्षण आहे. कारण ज्या समाजात गुरूला चांगले स्थान नाही, त्यांची प्रगती होत नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान मला आजवर मिळालेल्या सर्व सन्मानांत सर्वश्रेष्ठ असल्याचेही नमूद केले.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात ज्या अलौकिक गोष्टी घडल्या, त्या सगळ्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर घडल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी अधिक जागरूक राहून किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे. तर, प्रदीप रावत यांनी भारताचा इतिहास हा सहिष्णुता टिकवून ठेवण्यासाठी कसा गरजेचा आहे, याचा अभ्यास व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक जाधव यांनी, तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. विशाल सातव यांनी आभार मानले.