पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या नामदेव जाधव यांना काळी शाई फासण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
रमिज कासाम सय्यद, केतन सायबू ओरसे, अमोल रामनाथ परदेशी, अजिंक्य सोमनाथ पालकर, प्रियांका वसंतराव खरात अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 323, 336, 341, 352, 353, 504, 506, 506(2) असे गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींतर्फे वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, आरोपींना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध खोटी फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी हे फरार होण्याची शक्यता नाही. फिर्यादी व साक्षीदारांना आरोपी कुठलाही अडथळा किंवा संपर्क करणार नाही. सर्व आरोपी हे तरुण व सुशिक्षित आहे, म्हणून जामीन मंजूर व्हावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. या प्रकरणात आरोपींतर्फे अँड. प्रताप परदेशी, अँड स्वप्निल जोशी, अँड निखिल मलानी, अँड प्रमित गोरे, अँड विजय बाबर, अँड ऋषिकेश कडू यांनी काम पाहिले.