Pune: मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 01:10 PM2023-08-07T13:10:28+5:302023-08-07T13:11:35+5:30
राज्यात राजकीय भूकंपाने काका-पुतणे विभक्त...
- विजय सुराणा
वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांच्यासह अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
मावळ तालुक्याची ओळख गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला अशीही होती. परंतु गटबाजीमुळे तीस वर्षांत दोन्ही काँग्रेसचा आमदार झाला नाही. मावळात राष्ट्रवादीचा आमदार व्हावा यासाठी शरद पवार व अजित पवार यांनी प्रयत्न केले, पण ते झाले नाहीत. त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सुनील शेळके यांना उमेदवारी न दिल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी ते तब्बल ९० हजार मतांनी विजयी झाले. तेंव्हापासून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढले आहे.
राज्यात राजकीय भूकंपाने काका-पुतणे विभक्त
अजित पवार यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर शरद पवार यांना मानणारा तालुक्यात मोठा गट आहे. पण तूर्त तरी हा गट शांत दिसत होता. परंतु आता राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेकांनी काँग्रेसला पसंती दिली आहे. याबाबत बैठकादेखील सुरू झाल्या असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर फोनद्वारे संपर्क झाला आहे. १५ ऑगस्टनंतर तालुक्यात काँग्रेसचा मोठा मेळावा घेऊन प्रवेश केला जाणार आहे.