पुणे : रविवारी नवले पूल परिसरात भीषण अपघात झाला. जवळपास पन्नास गाड्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला होता, असं सांगितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघात झालेल्या घटनास्थळाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या, या नवले ब्रीजवरील वाहतूक कोंडी आणि येथे होणाऱ्या अपघातांबद्दल 2021 साली लोकसभेत प्रश्न मांडला होता. त्यावेळी नितीन गडकरी यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत काही बदल केले होते.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाले, पुणे महापालिकेकडून याठिकाणी सर्विस रोड करण्याची गरज आहे. NHAI ला विनंती आहे की, तज्ज्ञांना घेऊन इथल्या उतार कमी कसा करता येईल ते पाहावे. रोड सेफ्टीवर लक्ष दिले पाहिजे. आधीपेक्षा अपघात कमी जरी झाले असले ते आपल्याला शुन्यावर आणले पाहिजेत. गाडीच्या वेगामुळेही जास्त अपघात होत आहेत. सर्विस रोड, चांगले फुटफाथ आणि रोड सेफ्टीबद्दल लोकांना जागरूक करणे महत्त्वाचे आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राज्याचे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यांच्यावर टीका करणे ही आपली संस्कृती नाही. पण वारंवार राज्यातील महापुरषांबद्दल चुकीची वक्तव्य केली जातात हे दुर्दैवी आहे. राष्ट्रपतींना माझी विनंती आहे की, अशा चुका पुन्हा-पुन्हा होत आहेत याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पदाला न शोभणारी वक्तव्य राज्यपालांनी किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करू नये.