पुणे : आपला देश आता सुपर इकॉनॉमी बनण्याच्या मोडवर आहे. भारत आत्मनिर्भर होईल. आपण इकॉनॉमी पॉवर आत्मसात करू; पण देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होणार आहे. ती दूर झाली पाहिजे. यासाठी सामाजिक व सर्वसमावेशक विचार आवश्यक आहेत, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘नागपूरच्या मारवाडी फाउंडेशन’च्या वतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल’च्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उद्योजक विठ्ठल मणियार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अतुल पोटेचा, डी. आर. मल आणि सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते.
‘देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक मूल्याधिष्टित प्रगती आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे विचार भिन्नता नव्हे विचार शून्यता ही समस्या आहे. यासाठी सर्व विचारांचे पालन करणे हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. आज शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. यावर उद्याच्या भारताचे भवितव्य ठरणार आहे. सांप्रदायिकविरहित सामाजिक विचार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही. अशी प्रगल्भ संपन्नता एकात्म पद्धतीने पुढे जाईल तेव्हाच बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण होईल. भविष्यातला विद्यार्थी तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.