मार्गासनी : नव्याने बसवलेल्या राजगडावरील पालीच्या बाजूनी असलेला पहिलाच दरवाजाची एक बाजू कोसळली आहे. या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सुदैवाने या ठिकाणी कोणताही पर्यटक यावेळी उपस्थित नव्हता. किल्ल्याचं स्ट्रक्चरल ऑडिट न करताच दरवाजा बसल्यामुळे दरवाजा कोसळल्याचा आरोप शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी केला आहे.
किल्ले राजगडावर नुकतेच आठ प्रवेशद्वारावर नव्याने दरवाजे बसवण्यात आलेले होते. मोठ्या दिमाखात दरवाजे बसवण्याचा कार्यक्रम पार पडला होता. पुरातत्व विभागाकडून एका संस्थेस दरवाजे बसवण्यास परवानगी देण्यात आली होती. या संस्थेने हे दरवाजे बसलेले होते. किल्ल्यावरील अवशेषाचे मजबुतीकरण याबाबतचा कोणताही अहवाल पुरातत्त्व विभागाने प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे किल्ल्यावरील पहिल्याच दरवाजाची एक बाजू कोसळलेली आहे. याबाबत महेश कदम असे म्हणाले की, पुरातत्त्व विभागाकडे माहितीचा अधिकार टाकला असता किल्ल्याचं स्ट्रक्चरल ऑडिट याचा अहवाल मागविला होता. परंतु पुरातत्व विभागाकडून केवळ किल्ल्यावर दरवाजा बसवण्याची परवानगी दिल्याचे पत्र आम्हास माहिती अधिकारात देण्यात आले. त्यामुळे किल्ल्यावर बसविण्यात आलेले दरवाजे विना स्ट्रक्चरल ऑडिट करून बसवण्यात आलेले आहेत.
तसेच किल्ल्याचे बांधकाम जुने असून दरवाजाचे वजन बांधकामाचा दर्जा किल्ल्यावर असणारे वारे याबाबत कसलाही अभ्यास केलेला दिसत नाही. याबाबत पुरातत्व विभागाने किल्ल्यावरील स्ट्रक्चरल ऑडिटचा कुठलाही अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे किल्ल्यावरील दरवाजा कोसळला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा महेश कदम, सचिन खोपडे, देशमुख, नवनाथ पायगुडे, संतोष आलम, आनंदराव जाधव शिवशंभो प्रतिष्ठान व बारागाव मावळ यांच्याकडून देण्यात आला आहे.