पुणे : देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल आज (दि.२९) केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात १९८५ बिबट्यांची नोंद झाली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने ही गणना झाली. व्याघ्र श्रेणीतील राज्यांमध्ये चतुवार्षिक ‘वाघ, सह-भक्षक, शिकार आणि त्यांचे अधिवास’ या अभ्यासाचा भाग म्हणून बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची पाचवी फेरी नुकतीच पूर्ण केली. बिबट्या हा काहीसा अनाकलनीय प्राणी आहे म्हणजेच त्याच्या वर्तनाचा अंदाज लावणे कठीण आहे. हा प्राणी भारतातील त्यांच्या श्रेणीमध्ये अधिवासाची हानी, मानव-वन्यजीव संघर्ष आणि शिकारी दरम्यान, वाढत्या धोक्यांना तोंड देत आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) ने बिबट्याच्या लोकसंख्येच्या अंदाजाच्या पाचव्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण केले आणि मार्जार वर्गातील या प्राण्याची स्थिती आणि कल यावर प्रकाश टाकला. कॅमेरा ट्रॅपिंग, अधिवास विश्लेषण आणि लोकसंख्या व्यवस्थापन मॉडेलिंग अर्थात एखाद्या प्रजातींच्या जोखमीचा अंदाज घेण्यासाठी केलेला अभ्यास यामधून बिबट्यांचे प्रमाण कुठे किती आहे आणि त्यांचे संवर्धन करण्यात येणारी संभाव्य आव्हाने याविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या फेरीत मांसभक्षक प्राण्यांच्या पाऊलखुणा आणि शिकारीसाठी आवश्यक विपुलतेचा अंदाज लावण्यासाठी 6,41,449 किलोमीटर अंतरावरील प्रदेशाचे पायी सर्वेक्षण करण्यात आले.
भारतातील बिबट्यांची संख्या
२०२३ : १३,८७४ २०१८ : १२,८५२
बिबट्यांची राज्यांतील संख्या
मध्यप्रदेश : ३,९०७महाराष्ट्र : १९८५कर्नाटक : १८७९तमिळनाडू : १०७०
पुणे, नाशिकला सर्वाधिक संघर्ष
बिबट्यांच्या संवर्धनात संरक्षित क्षेत्रांचा किती महत्वपूर्ण सहभाग असतो, हे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. व्याघ्र प्रकल्प हे प्रमुख आधारस्तंभ म्हणून कार्य करत असतानाच या क्षेत्राबाहेरील बाह्य जगाचा देखील यात समावेश करणे अपेक्षित होते. ते झालेले नाही. कारण बिबटे हे अधिवास सोडून इतर ठिकाणी देखील गेले आहेत. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष अधिक गंभीर झाला आहे.