पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी आता १८ सप्टेंबरचा मुहूर्त ठरला असून पाऊस व वाहतुकीच्या नियोजनानुसार तसेच तज्ज्ञांच्या सूचनेनुसार पाडण्यात येईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. तर या जुन्या पुलावरील वाहतूक मंगळवारपासून बंद करण्यात आली असून मुळशीवरून येणाऱ्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे व सेवा रस्त्याचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणजेच अस्तित्वातील अरुंद पूल आता १८ सप्टेंबरला पाडण्यात येणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस व रस्त्यावरील प्रत्यक्ष वाहतूक याचा विचार करूनच याबाबतचा निर्णय संबंधित कंपनी घेईल अशी माहिती एनएचआयएचे अभियंता संजय कदम यांनी दिली.
हा पूल पाडण्याचे कंत्राट दिलेल्या नोएडा येथील कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी यांनी पूल पाडण्यासाठी पुलाला स्फोटके लावण्यासाठी दोन दिवसांपासून ड्रिलिंग (भोके पाडणे) सुरू केले आहे. हे ड्रिलिंग संपल्यावर हा जुना पूल मंगळवारपासून (ता. १३) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यावरील वाहतूक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील पाइपलाइनचे काम अजून सुरू आहे. याबाबतचे वाहतूक व्यवस्थापन पूर्ण झाले आहे, अशी माहितीही कदम यांनी दिली.
नवीन पुलावर वाहतूक वळवली
चांदणी चौकात सोमवारपासून जुन्या पुलाची वाहतूक थांबवण्याचे नियोजन होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे याला एक दिवस उशीर झाला आहे. मंगळवारी सकाळीच या पुलावर दोन्ही बाजूने बॅरिकेड टाकून वाहतूक वळविण्यासाठी फलक लावण्यात आले. त्यामुळे महामार्गाने वारजे व कोथरूडहून, पाषाणकडे जाण्यासाठी तसेच पाषाणहून मुळशीला जाण्यास मोठा वळसा घ्यावा लागत असला तरी वाहतूक न थांबता काहीशी सुरळीत झाली आहे. सकाळी व संध्याकाळी येथील वाहतुकीचे निरीक्षण केले असता महामार्गासह सर्वच रस्त्यांवर विशेष कोंडी जाणवली नाही. पूल पाडल्यावर व त्या खाली लगेच रस्ता झाल्यास महामार्गावर दोन्ही बाजूला अजून एक लेन वाहतुकीस उपलब्ध उपलब्ध होईल. त्यामुळे कोंडी कमी होणार आहे.