- राजू इनामदार
शोलेतील ‘सांबा’ पडद्यावर एखादा दुसरा मिनीटभर दिसूनही अजरामर झाला. शोलेला इतकी वर्षे झाल्यानंतरही अनेकांना तो अजूनही आठवतो. ‘नीलायम’मधील ‘सांबा’चे असेच आहे. थिएटर बंद पडून कितीतरी महिने झाले. पण, नीलायम म्हटले, की अजूनही अनेकांना तिथला ‘सांबा’ आठवतो. तो दिसायचा अगदी मॅकमोहनसारखाच. शरीरयष्टीही तशीच. राहायचाही तसाच. इन शर्ट, गालफाडात रुतलेली दाढी. तो अनेकांच्या ओळखीचा होता. थिएटरमध्ये बहुधा डोअरकीपर असावा. पण, त्याचा संपर्क आतबाहेर असा सर्वत्र असायचा. त्यामुळे हाऊसफुल्ल पिक्चरचे तिकीट हवे असेल तर तो ते हमखास द्यायचा. अनेक जण तर ‘सांबा’ आहे ना आपला असे म्हणून कधीही पिक्चरला यायचे. त्यांना सांबाकडून तिकीट मिळायचेच.
नीलायम ही तशी पूर्व भागातील, पण एक स्टँटर्ड टॉकीज होती. प्रशस्त आवार, बाल्कनीची तिकीट खिडकी वेगळी व खाली स्टॉलमध्ये बसायची वेगळी. भरपूर स्वच्छता. आतल्या सर्व लॉबीसुद्धा एकदम प्रशस्त. एखाद्या चित्रपटातच शोभावी, अशी ही टॉकीज होती. तिथे प्रेक्षकही एकदम ‘जंटलमेन’च यायचे. कुटुंबासह. लहान मुले वगैरे घेऊन. फक्त एक अडचण होती. ती म्हणजे लोकॅलिटी. या लोकॅलिटीने हे थिएटर पार बिघडवले होते. आजूबाजूचा सगळा परिसर जसा पूर्व भागात असतो अगदी तसाच होता. त्यामुळे थिएटरवर सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या वेळचे सगळे टपोरी शब्दश: पडीक असायचे. कोणी भाईगिरी दाखवायला लागले की सगळे एकत्र यायचे. मग भांडणे करणाऱ्याला बरोबर पळवत टॉकीजशेजारच्याच कॉलनीत न्यायचे आणि तिथे बुकलायचे.
चालणारे सगळे पिक्चर इथे लागायचे. ‘शोले’ त्यातला सर्वाधिक हिट. या शोलेची तिकीट ब्लॅक करून परिसरातील दोघांनी त्यावेळी स्कूटर खरेदी केली होती. त्याची चर्चा आजही या परिसरात असते. थिएटरच्या अवतीभोवती हा सगळा गोतावळा असायचा. वाहनतळ त्यांच्याकडेच. कँटीनही त्यांच्याकडेच. तिकीटविक्रीला तेच. ब्लॅक करायलाही तेच असा सगळा माहोल होता. सुदैवाने त्यांच्यातील बहुतेक जण पब्लिकला ओळखून असायचे. त्यामुळेच फारच कमी वेळा भांडणे, मारामाऱ्या व्हायच्या. उलट, या सगळ्यांचा बाहेरून येणाऱ्यांवर धाक असायचा. तरीही, अमिताभच्या अपघातानंतरच्या पहिल्याच पिक्चरला रांगेतच एकाचा खून झाला आणि थिएटर चांगलेच चर्चेत आले.
थिएटरमध्ये प्रवेश केला, की जणू एखाद्या मोठ्या बंगल्यातच आलो आहोत असा भास व्हायचा. पडदा, साउंड सिस्टीम सगळेच एकदम क्लास वन होते. त्यामुळे इथे चित्रपट पाहायला मजा यायची. पहिला खेळ सुटायला उशीर असेल, तर मग बाहेरच्या बाजूलाच कट्ट्यावर निवांत गप्पा मारत बसता यायचे. तसाही हा सगळा परिसर सारसबाग, पेशवे पार्क, पर्वती याने वेढलेला. त्यामुळे सगळीकडे प्रसन्नता खेळतच असायची. फारच चांगले थिएटर होते नीलायम. कोरोना सुरू झाला आणि त्याला ग्रहण लागले. तेव्हापासून जे बंद झाले ते परत सुरू झालेच नाही. एका चांगल्या टॉकीजची अखेर झाली. आता तिथे काय होणार, मॉल होणार, की टॉवर, कोणालाच माहिती नाही. थिएटरचे आरक्षण असल्याने मल्टिप्लेक्सही होईल कदाचित. मात्र, त्यात जुन्या ‘नीलायम’ची मजा नसेल.