उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार
By राजू इनामदार | Published: June 6, 2023 03:15 PM2023-06-06T15:15:20+5:302023-06-06T15:16:18+5:30
भाजप पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार करतंय, काँगेसचा आरोप
पुणे: मेट्रो चे थाटात उदघाटन केले, मात्र आता त्याला वर्ष होऊन गेले तरीही मेट्रोची धाव एक इंचही पुढे गेलेली नाही. या विलंबाला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सरकारमध्ये नियोजनाचा अभाव असल्यानेच हे होत असून हा तर पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
मागील वर्षी ६ मार्चला पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे या ५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी मेट्रोचे अधिकारी आत्ताच उदघाटन नको असे सांगत असतानाही महापालिका निवडणूक जाहीर होईल या शक्यतेने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी उदघाटनाचा घाट घातला अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. त्यानंतर वर्ष झाले, आताचा मार्चही गेला पण अद्याप गरवारे महाविद्यालयाच्या पुढील मेट्रो मार्ग सुरू झालेला नाही. उलट वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील ५ स्थानकांचे काम अजूनही अपूरेच आहे. लिफ्टसह अनेक कामे अजूनही सुरूच असल्याचे जोशी म्हणाले.
यामुळे मेट्रो मार्गाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. सलग ४ वर्षे हे काम सुरू आहे. आतापर्यंत काम पूर्ण होऊन संपूर्ण मेट्रो स्थानकांसहित सुरू होणे गरजेचे होते. कोरोनाचा ८ महिन्यांचा कालावधी जमेस धरला तरीही मेट्रोच्या कामाला विलंबच होत आहे. पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी हा एक प्रकारचा खेळच आहे व स्थानिक भाजप पदाधिकारी तो करत आहे असा आरोप जोशी यांनी केला.
मेट्रो त्वरीत पूर्ण क्षमतेने, संपूर्ण मार्गावर सुरू होणे ही पुण्याची आजची सर्वात महत्वाची गरज आहे. मात्र परत एकदा भव्य उदघाटन करण्याचा स्थानिक भाजपचा विचार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची धडपड पुणेकरांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांकडेच तक्रार करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. वनाज ते गरवारे हा मेट्रो मार्ग सुरू करण्याची घाई केली त्याप्रमाणेच आता संपूर्ण मेट्रो मार्गही तत्काळ सुरू करावा, उदघाटनाच्या फंदात पडू नये अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.