सासवड : पुरंदर तालुक्यात होणारा छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करणार असल्याचे सांगत अडीच हजार कोटींची तरतूद लाॅजिस्टिक पार्कसाठी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर शिवसेनेच्या वतीने मतदारांच्या आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शहर प्रमुख नाना भानगिरे, ईरफान सय्यद, जिल्हा उपप्रमुख रमेश कोंडे, आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण, शाखाप्रमुख नितीन ननवरे, महाराष्ट् चर्मकार संघाचे अध्यक्ष महादेव पाखरे, रमेश इंगळे, राजेश दळवी, माजी सरपंच गणेश मुळीक, हरिभाऊ लोळे, समीर जाधव, माणिक निंबाळकर, ममता शिवतारे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, तरुण, ज्येष्ठ नागरिक या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, समाधानाचे व धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. परंतु लाडक्या बहिणीने निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विरोधी पक्ष नेता होईल तेवढे पण संख्याबळ त्यांच्याकडे राहिले नाही. विरोधकांचा लाडक्या बहिणी सुपडा साफ करून टाकला, या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला.विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राखायचे असून त्यासाठी सदस्य नोंदणी अभियानाला तात्काळ गती द्यावी, असे आवाहन केले. आमदार, खासदार यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष द्यावे आणि या तालुक्यातील जेजुरी तसेच सासवड या दोन्ही नगरपरिषदेच्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री पुरंदरमध्ये येऊन कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असतानाच सभेला मात्र अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. सात गावातील महिला सरपंचांचे शिष्टमंडळ विमानतळ विरोधी निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यास गेले असता, त्यांना यावेळी अडवण्यात आले.फेसबुक लाईव्हने राज्य चालत नाहीकाहींनी घरात बसून राज्य चालवण्याचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह करून हे राज्य चालत नाही. कार्यकर्त्यांसाठी जनतेत जावे लागते. कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता मिळते व त्यामधून राज्य चालते. कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्यासाठी गावात गल्लीबोळामध्ये जावे लागते. घरात बसून राज्य चालवता येत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना जनतेने घरात बसवले असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.