पुणे: २०१४ पूर्वी देशात दंगली घोटाळे भ्रष्टाचार माजलेला होता. बॉम्बस्फोटही होत होते. मात्र, त्यानंतर याला आळा बसला असून देशात केवळ नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी चालते विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण असून, मोदींकडे मात्र विकासाचे धोरण आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे श्रीरंग बारणे तसेच बारामतीच्या सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर प्रेम करतात असे सांगून शिंदे यांनी मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम हटवून इतिहास निर्माण केला. त्यांनी राम मंदिराचीदेखील उभारणी केली. मात्र, काँग्रेसच्या राजवटीत भारत देशोधडीला लागला अशी खरमरीत टीका शिंदे यांनी यावेळी केली. देशाला लुटणारे एकीकडे तर देशाला महासत्ता बनवल्याने मोदी एकीकडे असे सांगत शिंदे यांनी पुणेकर हुशार असल्याचे स्पष्ट केले. एखाद्याची गाडी काढायची असल्यास त्याची हवा सोडली जाते. त्याच पद्धतीने पुणेकरदेखील एखाद्याला पराभूत करावयाचे असल्यास त्याची हवा काढून घेतात, असा दाखला देत शिंदे यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
फडणवीस यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर टीका करत या आघाडीत सर्वच पक्षांचे स्वतंत्र इंजिन आहेत. त्यात सामान्यांना बसण्यास जागा नाही. दुसरीकडे महायुतीचे इंजिन नरेंद्र मोदी असून यात सामान्यांना बसण्यास मोठी जागा असल्याचे प्रतिपादन केले. गेल्या दहा वर्षांत पुण्याचा चेहरा मोहरा बदलल्याचे सांगत मेट्रो, विमानतळ, टेक्नॉलॉजी हब यासारख्या गोष्टी पुण्याला देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
फडणवीस यांचीच री ओढत अजित पवार यांनीदेखील पुण्यातील मेट्रो विमानतळ रेल्वे राष्ट्रीय महामार्ग असे प्रश्न निकाली काढायचे असून, त्यासाठी केंद्राच्या निधीचीदेखील जोड गरजेची असल्याचे प्रतिपादित केले. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी एकाच विचाराचे सरकार असल्यास विकास जोमाने करता येईल, असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले. ही निवडणूक देशाची भवितव्य ठरवणारी असल्याने भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याची पुण्याची जबाबदारी असल्याचे ते यावेळी म्हणाले.