पुणे : कोथरूडमधील कै. तात्याराव थोरात उद्यानामध्ये पुणे महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे मोनोरेल प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु, या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे शनिवारी (दि.२) सकाळी ८ वाजता स्थानिक नागरिक एकत्र येऊन ‘मोनोरेल हटवा, थोरात उद्यान वाचवा’ अशा घोषणा देणार आहेत.
शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी असलेल्या थोरात उद्यानात मोनोरेल तयार करण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने दिलेला आहे. त्यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. स्थानिक नागरिकांनी या माेनोरेलची मागणी केलेली नाही. तरी देखील कोणाचीही मागणी नसताना केवळ उद्यान विभागाला वाटते म्हणून या उद्यानात मोनोरेल करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्यानातील अनेक झाडे तोडण्यात येणार आहेत. तसेच ओपन जिम, पादचारी मार्ग देखील फोडावा लागेल. ज्या ठिकाणी आज नागरिक सकाळी फिरतात, त्या ठिकाणी मोनोरेल प्रस्तावित आहे. हा सर्व कारभार कशासाठी ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ‘झाडांच्या करणार कत्तली, ओपन जिमची बरबादी, फूटपाथला लागणार कात्री, बाग बनणार क्रॉक्रिंटची राजधानी’ अशा प्रकारच्या घोषणा या वेळी नागरिक देणार आहेत. उद्यानामध्ये क्रॉक्रिंटची गरज काय ? विनाकारण निधीची उधळपट्टी होत आहे, असा संतापही व्यक्त होत आहे.
तब्बल ७० पिलर उभारणार
उद्यानात माेनोरेलसाठी ७० पिलर उभारण्यात येणार असून, हे १० फूट उंचीचे असतील. यासाठी उद्यानातील ट्री कट्ट्याचा ४० भाग तोडावा लागेल. या प्रकल्पाचा खर्च ५ कोटी ४७ लाख ११ हजार ७०३ रूपये आहे. चांगल्या उद्यानाची ‘वाट’ लावू नका, आम्हाला मोनोरेल नकोय, अशी भावना स्थानिक नागरिकांची आहे.