पुणे : महाविकास आघाडी सरकारने केवळ जनकल्याणाच्या योजनांना स्थगिती देण्याचेच काम केले. त्यामुळे या काळात महाराष्ट्राचा विकास मंदावला आणि भ्रष्टाचार फोफावला, असा आरोप केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. महायुती सरकारच्या काळात लाडकी बहीण योजनेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला आणि न्यायालयात गेले. पण, आता त्यांनीच स्वतःच्या जाहीरनाम्यात अशीच योजना टाकणे हास्यास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते. गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून सरकार चालवले. त्यामुळे करोना काळात अनेकांचा जीव गेला. करोनाकाळात या सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. तत्कालीन गृहमंत्र्यांंना तुरुंगात जावे लागले. अशा फसव्या आघाडीवर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटी बहिणींना मिळाला आहे. राजस्थानात फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. पर्यटनाला चालना पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला केंद्राने ८० कोटी रुपयांचे साह्य केले आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा देशातील पर्यटन केंद्रांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील दहा किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित व्हावेत, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विविध राज्यांनी आठ हजार कोटी रुपयांच्या पर्यटन प्रकल्पांसाठीचे प्रस्ताव पाठवले आहेत, असे गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.