पुणे : महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. सध्या कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अशावेळी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. परिणामी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असते. पुण्यात आज सर्वाधिक ४१.३ कमाल तापमानाची नोंद झाली, तर कोरेगाव पार्कला ४३.३, वडगावशेरीला ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यामध्ये ३० एप्रिल ते ४ मे पर्यंत हवामान कोरडे राहील. कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सोमवारी (दि.२९) कोकणात ‘यलो अलर्ट’ दिला आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहणार असून, त्यामुळे तिथेही सोमवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे परिसरात मात्र आकाश निरभ्र राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असेल.
ज्यावेळी वारे हवेच्या अधिक दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने जात असतात तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर ढग जमा होतात आणि पाऊस पडतो. त्या पावसाला पूर्वमोसमी पाऊस असे म्हटले जाते. सध्या कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. बहुतांशी भागांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे.पुण्यात रविवारचे कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे. परिणामी रविवारी दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे, तसेच किमान तापमानदेखील चांगलेच वाढले आहे. वडगावशेरीला तर २९.९ किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील कमाल तापमानही ४१ अंशांवर गेले आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे.
पुण्यातील किमान व कमाल तापमान
वडगावशेरी - २९.९ - ४३.०इंदापूर - २८.९ - ४१.७
मगरपट्टा - २८.६ - ४१.९चिंचवड - २८.१ - ४२.९
कोरेगाव पार्क - २७.६ - ४३.३हडपसर - २७.१ - ४२.७
लोणावळा - २४.२ - ३९.४शिवाजीनगर - २३.८ - ४१.३
सर्वाधिक तापमानाची नोंद
२८ एप्रिल २०१९ ला एप्रिलमधील १०० वर्षांतील सर्वाधिक कमाल तापमानाची ४३ अंश इतकी नोंद शिवाजीनगरला झाली होती. आज शिवाजीनगरला कमाल तापमान ४१.३ सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारीदेखील तापमानाचा पारा ४१ वर राहील. उष्मा वाढून घामाच्या धारा लागण्याची शक्यता आहे. पुढील ३ दिवसांत तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.