पुणे: ‘ख्रिसमस’चे ‘नाताळ’ हे मराठीकरण फारच गोड आहे. नाताळची मराठीतील गाणीही आहेत. ऐकायला तीसुद्धा गोड आहेत. पुण्यात ख्रिश्चन धर्माची अनेक प्रार्थनास्थळे आहेत. त्यांना चर्च म्हणतात. पुण्यातील देवळे जशी वैशिष्ट्यपूर्ण तशीच चर्चही. पेशव्यांच्या काळात पेशव्यांनी दिलेल्या जागेवर बांधलेले चर्च अजूनही पुण्यात आहेत. पुण्यातील अशाच काही चर्चचा हा नाताळनिमित्त घेतलेला आढावा.
काही वर्षांपूर्वी पुण्यात कर्वे रोडवरच्या नळस्टॉप शेजारी भल्या पहाटे एका झाडावर बिबट्या दिसला. दोन-तीन तासांच्या धावपळीनंतर तो बिबट्या पकडण्यात आला. त्याच्यापासून कोणालाही कसलाही धोका वगैरे झाला नाही. मात्र त्या बिबट्यामुळे दीडशे वर्षे जुन्या असलेल्या, एका लहानशाच, पण आपल्या खास वास्तुशास्त्रीय शैलीमुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ‘सेंट क्रिस्पिन होम चर्च’ची पुणेकरांना माहिती झाली ! अशी वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा जपणारी दीड-दोनशे वर्षांची अनेक चर्चेस पुण्यात आहेत. पुण्यात आयुष्य घालवलेल्या अनेकांना आपल्या अवतीभोवती असलेल्या या चर्चची माहितीही नसते. पुणे हे एके काळी पेन्शनरांचे, दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जात असे. तसेच पुणे हे ख्रिस्ती देवळांचेही म्हणजे चर्चेसचे शहर आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
पेशव्यांनी दिली चर्चसाठी जागा
पुण्यात क्वॉर्टर गेटपाशी असलेले इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च किंवा सिटी चर्च हे शहरातील आणि अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत जुने चर्च. या चर्चसाठी सन १७९२ मध्ये सवाई माधवराव पेशवे यांनी जागा दिली होती हेही आज कोणाला माहिती नसेल. पुण्यात स्थायिक झालेल्या गोंयेंकार लोकांचे चर्च म्हणून ते आजही ओळखले जाते. सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पंचहौद चर्च आणि खडकी येथील सेंट इग्नेशिअस चर्च यांचा पुण्यातील सर्वांत जुन्या ख्रिस्ती देवळांमध्ये समावेश होतो. पुणे शहराचा शून्य मैलाचा दगड असणारे ब्रिटिशकालीन स्मारक जनरल पोस्ट ऑफिस शेजारी आहे. या जीपीओच्या मागेच गोलाकार आकाराचे सन १८६७ मध्ये काळ्या पाषाणातून उभे राहिलेले सेंट पॉल चर्च आहे.
पवित्र नाम देवालय
गुरुवार पेठेतील १८८५ साली बांधलेले, उंच मनोरा असलेले भव्य ‘पवित्र नाम देवालय’ किंवा ‘होली नेम कॅथेड्रल’ एके काळी पुणे शहराची ओळख किंवा स्कायलाइन होते. आज १३९ वर्षांनंतरही या चर्चच्या भिंती तेवढ्याच भक्कम आहेत. त्यांची बांधणी, उंची, आतील रचना, सर्वात उंचावर असलेल्या मोठ्या घंटा, त्याला लावलेल्या दोऱ्या, त्या वाजवण्याची पद्धत हे सगळेच रंजक आहे. पुणे कॅम्पात येशू संघीय (जेसुईट) धर्मगुरूंनी सन १८६२ मध्ये सेंट झेव्हिअर्स चर्च बांधले. प्रख्यात चित्रकार ॲग्नेलो डी फोन्सेका यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्सच्या जीवनावर आधारीत काही चित्रे या चर्चमध्ये काढली. ख्रिस्ती आशयांवरची मात्र भारतीय शैलींतील चित्रे हे ॲग्नेलो डी फोन्सेका यांच्या चित्रांचे खास वैशिष्ट्य आहे. ही चित्रे या चर्चचे वैभव झाली आहेत.
शिंदे यांच्या सैनिकांसाठी चर्च
पुण्यातील वानवडी येथील सरदार शिंदे यांच्या सैन्यातील कॅथोलिक सैनिकांसाठी मुंबईतून धर्मगुरू नेमण्यात येऊ लागला. सन १८३५ मध्ये वानवडी येथे चॅपेल किंवा छोटे चर्च बांधण्यात आले, ब्रिटिश सरकारने १८५० मध्ये दिलेल्या जागेवर चर्चची उभारणी झाली. हेच ते आताचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पुणे धर्मप्रांताचे म्हणजे बिशपांचे मुख्यालय. सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल हे पुण्यातील एक सर्वांत महत्त्वाचे चर्च. गोपूर आणि कमळ असलेले चर्च सोलापूर बाजार रोडवरचे सेंट ॲन्स चर्च हे पुण्यातील तसे नव्यानेच म्हणजे १९६३ मध्ये बांधलेले चर्च मात्र अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाहेरून पाहिले तर ती वास्तू ख्रिस्ती प्रार्थनामंदिर आहे, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. याचे कारण म्हणजे हे चर्च दाक्षिणात्य पद्धतीने गोपूर शैलीत बांधलेले आहे. दर्शनी भागात कमळ कोरलेले आहे.
मराठीतही उपासनाविधी पुणे हे भारतीय कॅथोलिक चर्चच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थान आहे. इथे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) रस्त्यावर रामवाडी येथे पेपल सेमिनरी आणि डी नोबिली कॉलेज या भावी धर्मगुरूंना प्रशिक्षण देणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था आहेत. पोप जॉन पॉल दुसरे हे पहिल्यांदा १९८६ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी रामवाडी मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत मिस्साविधी केला होता.
पुण्यातील ख्रिस्ती समाज बहुभाषिक असल्याने अनेक चर्चेसमध्ये इंग्रजी, मराठी, तमिळ, कोंकणी, मल्याळम वगैरे भाषांत उपासनाविधी होतात. काही चर्च मात्र केवळ मराठी भाषक ख्रिस्ती समाजासाठी आहेत आणि तेथील सर्व प्रार्थना, गायन आणि उपासनाविधी केवळ मराठी भाषेतच होतात. ते ऐकणे मोठे आनंददायी असते. घोरपडीत तेलुगू भाषेत मिस्साविधी प्रामुख्याने मराठी भाषकांसाठी असलेल्या शहरातील चर्चेसमध्ये क्वाॅर्टर गेट नजीकचे क्राइस्ट चर्च, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च, खडकी येथील सेंट मेरीज चर्च, गुरुवार पेठेतील होली नेम कॅथेड्रल किंवा पंचहौद चर्च, कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे चर्च यांचा समावेश होतो.
संपूर्ण पुणे शहरात केवळ घोरपडी येथील सेंट जोसेफ चर्च येथेच तेलुगू भाषेत मिस्साविधी होतो. कारण या भागातील बहुसंख्य भाविक तेलुगूभाषक आहेत. सर्वधर्मीयांसाठी खुली वास्तूशास्त्र, ऐतिहासिक वारसा, इतिहास किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक असणाऱ्या लोकांनी पुणे शहराच्या विविध भागांत दडून असलेल्या या मूल्यवान ऐतिहासिक स्मृतिस्थळांना भेट द्यायलाच हवी. नाताळाच्या आगमनानिमित्त या ख्रिस्तमंदिरांत विविध कार्यक्रम होत आहेत. कॅरोल सिंगिंग किंवा नाताळाच्या गीतांसाठी युवामंडळी घरोघरी जात आहेत. चर्चमध्ये वेदींची आणि ख्रिस्तजन्माच्या सजावटी तयार केल्या जात आहेत. जगातील कुठलेही ख्रिस्ती प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च ही ख्रिस्ती भाविकांप्रमाणेच इतर धर्मीयांनाही अगदी प्रार्थनेच्या वेळीही खुली असतात. जगभरातल्या ख्रिस्ती मंदिरांत शांतता पाळणे हा एक नियम असतो, त्याचे पालन व्हावे एवढीच किमान अपेक्षा असते.
- कामिल पारखे (लेखक मुक्त पत्रकार आहेत.)