पुणे: एकेकाळी पुण्याचे वैभव असलेला पाषाण तलाव आज अत्यंत वाईट अवस्थेत आहे. पुण्याच्या मध्यभागी असलेला पाषाण तलाव हा मानव निर्मित तलाव असून, गर्व्हनर बंगल्यास (आत्ताचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर ) आणि पाषाण सुतारवाडी भागास पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने ब्रिटिश काळात हा तलाव बांधण्यात आला होता. स्थलांतरित पक्षांचे वस्तीस्थान म्हणून या तलावाची ख्याती होती. अलीकडच्या काळात ढिसाळ व्यवस्थापन, अनियोजित विकास, प्रदूषण इत्यादींमुळे या तलावाची दुर्दशा झाली आहे. या तलावाचे पुनरुज्जीवन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी अभ्यासपूर्ण कृती आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने पाषाण तलावास मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यात येणार आहे.
किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने अतिक्रमण, अस्वच्छता, प्रदूषण आणि राड्यारोड्याच्या विळख्यात सापडलेल्या रामनदीचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी नवनवीन प्रयोग सातत्याने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाषाण तलावाच्या पुनर्वैभव प्राप्तीसाठी किर्लोस्कर वसुंधराने पुढाकार घेतला असल्याची माहिती इकोलॉजीकल सोसायटीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. गुरूदास नूलकर आणि किर्लोस्कर वसुंधरा रामनदीपुनरुज्जीवन अभियानाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वसुंधरा स्वचछ्ता अभियानाचे अनिल गायकवाड, मिशन ग्राऊंड वॉटरच्या वैशाली पाटकर, जल देवता सेवा अभियानाचे शैलेंद्र पटेल आणि पर्यावरण तज्ज्ञ ज्योती पानसे उपस्थित होते. जल प्रजातींना घातक ठरणा-या बोटींसारख्या सुविधेला परवानगी दिल्याने मानवी हस्तक्षेप वाढला. बावधान, बाणेर, पाषाण या भागात वाढलेल्या शहरीकरणामुळे प्रक्रियामुक्त सांडपाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे प्रदूषणात भरच पडली असल्याचे डॉ.नूलकर यांनी सांगितले.
पाषाण तलावाची वैशिष्ट्ये
पाषाण तलाव परिसर पाणथळ परिसंस्थेने घेरलेला आहे. बशीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या आणि उथळ काठ असलेला हा तलाव नैसर्गिक विविधतेने संपन्न आहे. समृद्ध वैविध्यपूर्ण अधिवास स्थलांतरीत पक्षी आणि जलचरांकरीत उपलब्ध होत होता. परंतू 2008 ते 2013 या काळत तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाथाली इथला वैशिष्ट्यपूर्ण अधिवास नष्ट केला गेला. निलगिरी आणि बांबू यासारखी झाडे लावून इथला नैसर्गिक आधीवास काढूनटाकण्यात आला. पाश्चात्य देशांसह भारतातील दुर्गम भागातून दुर्मिळ प्रजाती आणि पक्षी येथे सातत्याने निसर्गचक्राप्रमाणे नियमितपणे स्थलांतर करून येत होते. 2013 नंतर मात्र, हे चित्र बदलले.
काय करावे लागेल?
तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी नैसर्गिक इको सिस्टीम उभे करणे गरजेचे आहे. खाटपेवाडी, भुकूम, भूगांव, डिआरडीओ अशी टप्प्या टप्प्याने स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. पाषाण तलावाच्या सभोवतालचे मृदा आणि जल परीक्षण सासत्याने करणे आवश्यक आहे. तलावात कारंजे उभे करून पाण्यातील प्राणवायू 8 पीपीएम पर्यंत आणावा लागेल.