पुणे : बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला. संध्याकाळी अक्षयला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्याच वेळी आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. निलेश मोरेंच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला.
अक्षय शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. त्याला तातडीने कळवा येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले. याबाबत सुषमा अंधारे यांनी आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार केलेल्या पोलिसांचे निलंबन व्हावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची न्यायाधीशांच्या समिती कडून चौकशी व्हायला पाहिजे. ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालते त्याबद्दल आम्हाला विश्वास नाही. २४ तासात घटनेची माहिती मानवाधिकार यांना दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.
अंधारे म्हणाल्या, अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. अक्षय शिंदे तळोजा मधून बदलापूर मध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्रा कडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं गेलं? ज्या पिस्तूल ने अक्षय वर गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. अक्षय शिंदे याला पिस्तूल चे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कंबरेला लागलेलं पिस्तूल कसं काढलं जातं? असे सवालही अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी
संजय शिरसाट यांनी या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. अक्षय शिंदे गतिमंद होता असे पोलिसांनी सांगितलं होतं तर मग तो एवढा हुशार कसा निघाला? संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हात होता. प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता. हा माणूस सस्पेंड होता.
माझीच बॅट, माझाच बॉल असं झालं
देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवला का? आपण नितेश राणे यांना समज देऊ शकला नाहीत. अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नाही. कोणाला वाचवल जातेय आहे? ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. ही फेक एन्काऊंटरची स्क्रिप्ट आहे. मी प्रश्न उपस्थितीत केला आहे, मग फडणवीस यांनी काय केलं पाहिजे. ९ एम एम चे पिस्तूल सामान्य माणसाला त्याचं लॉक उघडता येत नाही. एस आय टी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट, माझाच बॉल असं झाल असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.