पुणे : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काहीना काही पुरावा मागे ठेवत असतो, असे म्हटले जाते. फक्त या पुराव्याचा व्यवस्थित शोध घेऊन गुन्हेगारांपर्यंत पोहचणे, पोलिसांचे कसब असते. येरवड्यामध्ये महिलेच्या खुनाचा गुन्हा घटनास्थळी सापडलेली टोपी अन् चपलेवरून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
सतीश संतोष हारवडे (वय ४५, रा. फिरस्ता, मूळ गाव नांदेड) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार करण्यास विरोध केल्याने त्याने या महिलेचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
गीता राजेशकुमार कुंभार (वय ४६, रा. ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ, पर्णकुटी पायथा, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव होते. याबाबतची माहिती अशी, गीता या शनिवारी ३० जुलै रोजी मुलीबरोबर खेडशिवापूर येथून घरी आल्या होत्या. मुलगी आपल्या घरी निघून गेल्यावर पहाटे दीड वाजता घरातून बाहेर पडल्या. त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याच्या कारणातून यापूर्वीदेखील त्या घरातून निघून गेल्या होत्या. परंतु तसे झाले नाही. सोमवारी गीता यांचा मृतदेह येथील ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झाडीत अडगळीच्या जागेत सापडला. त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून त्यांचा खून करण्यात आला होता. मृतदेहाजवळ एक पिशवी मिळून आली. त्यामध्ये गीता यांची कागदपत्रे होती. त्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली.
असा उघडकीस आला खून
ज्या ठिकाणी गीता यांचा मृतदेह आढळून आला होता. तेथे पोलिसांना पुरुषाची टोपी आणि एक चप्पल मिळाली होती. हाच काय तो एकमेव धागा होता. गीता घरातून निघून गेल्यावर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या दिसून आल्या होत्या. गीता या रिक्षात बसल्या असताना सतीश हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत होते. मात्र त्यात त्याचा केवळ खांदा दिसत होता. पोलिसांनी परिसरातील एका देशी दारू दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यात पोलिसांना खुन्याचा सुगावा लागला. मृतदेहाजवळ सापडलेली टोपी तेथे आलेल्या सतीश याच्या डोक्यावर दिसून आली. त्यावरून पोलीस गेले पाच दिवस त्याचा शोध घेत होते. कचरावेचक असल्याने तो एका भंगार दुकानात गेला होता. त्याने सतीशला ओळखले. तेव्हा परिसरात शोध घेतल्यावर तारकेश्वर मंदिर परिसरात तो पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली.
सतीश हा घरी भांडण करून पुण्यात आला असून भंगार वेचण्याचे काम करीत होता. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, कर्मचारी प्रदीप सुर्वे, दत्ता शिंदे, कैलास डुकरे, उमेश चिकणे यांच्या पथकाने केली.