पुणे : गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. विकसित भारत योजनेंतर्गत देशाची आर्थिक उन्नती, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य आहे. विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून, त्यांचा सशक्त व सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. ‘माय भारत’च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; कारण राजकारण हे क्षेत्र वाईट नाही, असेही त्यांनी सूचित केले.
विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शुक्रवारी विकसित भारत ॲम्बॅसेडर : युवा कनेक्ट प्रोग्रामअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री खडसे बोलत होत्या.
खडसे म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्याला २०४७मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारने दूरदृष्टी ठेवून अनेक योजनांचे विस्तारीकरण केले आहे. केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांमध्ये युवकांनी सहभाग नोंदवून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. या योजनांमध्ये युवक सहभागी झाल्यास भविष्यात युवकांनाच त्याचा लाभ होणार आहे.
अवकाश संशोधन क्षेत्रात युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. या योजनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचे पाठबळ मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात युवा पिढीचा मोठ्या प्रमाणात सहभाग तसेच मार्गदर्शक सूचनांचे स्वागत असेल, असेही खडसे म्हणाल्या. शिस्तबद्धता, मानसिक ताणतणावातून मुक्ती, उत्तम आरोग्य तसेच आयुष्यात सर्वांगिण समतोल साधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.