पुणे : मतदानाचा प्रत्यक्ष व अचुक आकडा वेेळेत मिळावा यासाठी राज्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रांना आता सशक्त मोबाईल नेटवर्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांना दूरसंचार विभागाकडून मतदानावेळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यात सर्वाधिक दुर्गम मतदान केंद्र सिधुदुर्ग जिल्ह्यात १६५ इतकी असून त्याखालोखाल नंदूरबारमध्ये १५० तर रत्नागिरीमध्ये १४८ मतदान केंद्र आहेत.
निवडणूक प्रक्रिया सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बनली असून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अनेक मोबाईल ॲपमधून माहिती मुख्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोचवावी लागते. मात्र, दुर्गम भागातील निवडणूक केंद्रांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने या भागातील माहिती वेळेत पोचू शकत नाही. परिणामी मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी काढण्यासाठी अडचणी येतात. तसेच अशा मतदान केंद्रावर मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे तेथील समस्या सोडविण्यासाठी वेळ लागतो. यावर तोडगा म्हणून राज्यातील अशा दुर्गम मतदान केंद्रांवरील सशक्त मोबाईल नेटवर्क लावण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दूरसंचार विभागाला मोबाईल नेटवर्क सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
या ठिकाणी मोबाईल नेटवर्क कव्हरेज नसल्याने आतापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना उपग्रह फोनचा वापर करावा लागत होता केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा मतदान केंद्रांना व्हाईस शॅडो झोन अर्थात फोन कॉलमध्ये अडथळा आणणारे क्षेत्र तसेच इंटरनेट शॅडो झोन अर्थात मोबाईल कनेक्टिव्हिटी अत्यंत कमी असणारे अशा दोन भागात विभागणी केली आहे. त्यानुसार व्हाईस शॅडो झोनमध्ये राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांना आता तात्पुरते सशक्त मोबाईल नेटवर्क देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दूरसंचार विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे.
सशक्त मोबाईल नेटवर्कमुळे या मतदान केंद्रांवरील मतदानाची दर दोन तासांनी मिळणारी माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकणार आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी मतदान संपल्यानंतर तातडीने उपलब्ध होऊ शकणार आहे. - श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र
जिल्हा दुर्गम मतदान केंद्र संख्या
सिंधुदुर्ग १६५, नंदूरबार १५०, रत्नागिरी १४८, नाशिक १०३, गडचिरोली ८८, रायगड ७९ ,अमरावती ७२, नगर ६४, पुणे ५३, कोल्हापूर ४७, चंद्रपूर ३७, पालघर ३३, गोंदिया ३२, धुळे ३२, सातारा ३०, बुलढाणा २७, यवतमाळ २६, छत्रपती संभाजीनगर २१, जळगाव १५, लातूर ११, सांगली ३, वर्धा २, ठाणे १, बीड १