सुपे : पश्चिम पट्टयातील जिरायती भागातील सुप्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांचे एकमत असेल तर सुप्यात नगरपंचायत होऊ शकते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सुपे येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर होते.
पवार म्हणाले, पुर्वी बसचा पास ७० रुपये ऐवढा होता. मात्र आता तो पास परवडत नसल्याने बंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रवाशांना या पासचा लाभ मिळणार आहे. ७०० कोटीचा तोटा पीएमपीएलला सहन करावा लागत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमुळे हवेत प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक बस सुरु कराव्या लागतील तरच महामार्गावर बसेस दिसतील असे पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पुणे जिल्हा बॅंक शुन्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजपंपाची थकबाकी ठेवु नये. यावर्षी जिल्हा बॅंकेने ३ हजार ८०० कोटी पीक कर्ज दिले. तर आता ४ हजार कोटी पीककर्ज देण्याचे उद्दिष्टे जिल्हा बॅंकेचे आहे. मयुरेश्वर पतसंस्थेतर्फे १५ टक्क्यापेक्षा कमी व्याज दराने कर्ज दिले पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले. सुप्यात महिला पोलिस सेंटर उभारण्याचा मानस असुन त्यासाठी याठिकाणी १०० एकर जागा शोधण्याचे काम सुरु आहे. विकास कामे करित असताना ते दर्जेदार व्हावीत असा मानस पवार यांनी व्यक्त केला. येथील ओपन जिम पाहुन नाराजी व्यक्त केली. तर ग्रामीण भागात वीजेची बचत कशी करावी समजत नाही. त्यामुळे यापुढे हायमास दिवे देण्याचे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. तसेच येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चा व्हावा यासाठी मंत्रालयातुन पाठपुरावा करणार आहे. तर सुपे तलावाचे सुशोभीकरण करण्याबाबतही प्रांतअधिकारी यांना सुचना देण्यात आल्या.