आळंदी : आळंदी शहरालगतच्या केळगाव (ता. खेड) हद्दीत एक तरुण दारूच्या नशेत थेट उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढला. विशेष म्हणजे तब्बल १२ तासांहून अधिक वेळ तो टॉवरच्या टोकावर बसून होता. तर त्यादरम्यान त्याचे मनपरिवर्तन करताना पोलिस, वीज वितरण कंपनी व स्थानिकांच्या नाकीनऊ आले. सुदैवाने त्याला विजेचा शॉक बसला नाही. दरम्यान रविवारी (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास संबंधित इसमाला विद्युत वाहिनीच्या टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले.
किशोर दगडोबा पैठणे (वय ३० वर्षे सध्या रा. वाघोली पुणे, मूळ रा. मेळा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा) हा दारूच्या नशेत शनिवारी (दि.१९) रात्री केळगाव हद्दीतील उच्च दाब विद्युत वाहिनी टॉवरच्या टोकावर चढून बसला. स्थानिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरूणाला टॉवरवरून खाली उतरविण्याची विनंती केली. मात्र तो काही केल्या खाली येईना. त्यानंतर पोलिसांनी विद्युत वीज महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले. सलग चार - पाच तास त्याला खाली उतरविण्यासाठी अथक प्रयत्न करूनही तो काही येईना. अक्षरशः त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्र जागून काढली. दरम्यान आज (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस कर्मचारी, अग्निशम दलाचे लिडिंग फायर अधिकारी भाऊसाहेब धराडे व त्यांचा स्टाफ, विद्युत वहिनी देखभाल विभाग पिंपरी चिंचवड अतिरिक्त अधिकारी गिरीश पंतोजी व त्यांचा स्टाफ तसेच पोलीस मित्र, रुग्णवाहिका असा ताफा बोलाविण्यात आला. सर्वांच्या मदतीने संबंधित तरुणाचे मनपरिवर्तन करून त्याला खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सदर इसमास आळंदी पोलिसांनी दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याची आई लता दगडोबा पैठने यांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले.