पुणे: आमचं पहिलंच ‘पुरुषोत्तम’ आहे आणि महाविद्यालयदेखील सात ते आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘पुरुषोत्तम’मध्ये उतरलं आहे. त्यामुळे कुणालाच ‘पुरुषोत्तम’चा अनुभव नाहीये. पहिल्यांदाच आम्ही सहभागी झालो आहोत. पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवले तेव्हा थोडंसं दडपण, भीती, हुरहुर होतीच... प्रेक्षागृहात बसलेल्या इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका पाडण्याचा काहीसा प्रयत्न केला; पण, आमच्या महाविद्यालयाच्या सिनिअर्सनी आरोळ्या ठोकून आम्हाला प्रोत्साहन दिलं... हे बोल आहेत, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या पहिल्याच दिवशी ‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान’ ही एकांकिका सादर केलेल्या मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे.
‘अरे, आवाज कुणाचा..?’ असा जयघोष... विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुललेला भरत नाट्य मंदिराचा परिसर... एकांकिका सादर करणाऱ्या कलाकारांमध्ये भरलेला युवाजोश, थोडीशी भीती, हुरहुर, आनंदात आणि उत्साहात तरुण कलाकारांनी केलेले एकांकिकांचे सादरीकरण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारपासून (दि. १६) दमदार सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान’ या एकांकिकेने सुरुवात झाली. त्यानंतर आयएलएस विधि महाविद्यालयाची ‘आरं संसार संसार’ आणि शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘राखणदार’ या एकांकिकेचे सादरीकरण झाले.
वेगळे करायचे म्हणून हटके शीर्षक
आम्हाला एकांकिका करताना मजा आली. आम्ही आधी गंभीरपणे विषय मांडला. पण, मुद्दा पोहोचवायचा असेल तर तो हलकाफुलका पद्धतीने मांडू. काहीतरी वेगळे करायचे म्हणून हटके शीर्षक दिले. जरी यंदा पुरुषोत्तम मिळाले नाही तरी तितक्याच उत्साहात आम्ही पुढील वर्षी सादर करू. - प्रतीक बोराळकर, लेखक, चिकन खर्डा विथ गार्लिक नान, मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय
नक्कीच या वर्षीचा करंडक आमचा
२०१४ नंतर आम्हाला करंडक मिळालेला नाही. तो मिळण्याच्या उद्देशानेच आम्ही या वर्षी स्पर्धेत उतरलो आहोत. तसेच आमच्या प्राचार्यांनी हा करंडक जिंकलेला असल्याने आम्हाला त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. आम्हाला आमच्या सादरीकरणावर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच या वर्षीचा करंडक आमचा असेल. - पूर्वा हरगुडे, दिग्दर्शक आयएलएस विधि महाविद्यालय
एकांकिका अंतिम फेरीत जावी
आम्ही जेव्हा पुरुषोत्तम करंडक केलं. तेव्हा एवढ्या संधी आम्हाला नव्हत्या. कारण त्या काळी फक्त वाचून बोलून असे विषय केले जायचे. परंतु आताच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. अनेक विषय त्यांना हाताळता येतात. ‘आयएलएस’कडून १९८९ साली आम्ही पहिल्यांदा ‘आंधळी कोशिंबीर’ ही एकांकिका ‘पुरुषोत्तम’मध्ये सादर केली होती आणि त्याला ‘पुरुषोत्तम’ करंडक मिळाला होता. १९९१ व १९९९ मध्येदेखील करंडक मिळाला होता. त्यानंतर २०१५ नंतर महाविद्यालयाला करंडक मिळालेला नाही. आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये परिपक्वता अधिक असल्याचे जाणवते. मुलांनी खूप कष्ट घेतले आहेत. एकांकिका अंतिम फेरीत जावी, अशी इच्छा आहे. - दीपा पातुरकर, प्राचार्या, आयएलएस महाविद्यालय
‘पुरुषोत्तम’मध्ये आज (दि. १७) सादर होणाऱ्या एकांकिका
* व्हीआयआयटी (पासवर्ड)* राजीव शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे)* कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय (पूर्णविराम)