दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे
By राजू इनामदार | Published: May 9, 2023 06:01 PM2023-05-09T18:01:13+5:302023-05-09T18:01:33+5:30
लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप त्यांनी ज्याच्यावर केला तो भारतीय जनता पक्षाचा खासदार विनासंकोच सगळीकडे फिरतोय
पुणे: दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार एक शब्द बोलायला तयार नाही. त्याऐवजी त्यांची अवहेलना केली जात आहे. अशी स्थितीत शांत न बसता महिला असलेल्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी यावर सरकारला कृती करण्यास भाग पाडावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले की, देशाला जागतिक स्तरावर पदके मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीगिरांचे साधे म्हणणे काय तेही सरकार ऐकायला तयार नाही. ते काय आरोप करत आहेत, त्याची चौकशी दूरच पण त्यांची साधी विचारपूस करण्याचे सौजन्यही सरकार दाखवत नाही. यापूर्वीही शेतकरी आंदोलन करत असताना तब्बल ११ महिने केंद्र सरकारने त्याची दखलच घेतली नाही. देशातील कोणत्याही सरकारने याआधी असा प्रकार केलेला नाही. सरकार लोकांना उत्तरदायी असते हेच बहुधा मोदीू सरकारला मान्य नसावे. राष्ट्रपती पदावर महिला आहेत. किमान त्यांनी तरी या महिला मल्लांची दखल घ्यावी, सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगावे. लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप त्यांनी ज्याच्यावर केला तो भारतीय जनता पक्षाचा खासदार विनासंकोच सगळीकडे फिरतो, जाहीर कार्यक्रम करतो हा प्रकार भारताला शोभा देणारा नाही, त्यामुळे यावर राष्ट्रपतींनी त्वरीत भाष्य करावे अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे तिवारी यांनी सांगितले.