ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील उंब्रज पांध शिवारात शेतकरी भगवान महादेव तांबे यांच्या शेतातील कांदा काढण्यासाठी आलेल्या आणि रात्रीच्या सुमारास त्याच शेतात झोपलेल्या शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. ही घटना १५ मार्चला रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील काही शेतमजुरांच्या टोळ्या कांदा काढणीसाठी ओतूर परिसरात आलेल्या आहेत. त्या मजूर टोळ्यांपैकी रविता उकार किराडे (वय २०) ही महिला कांद्याच्या शेतात झोपली होती. दरम्यान अतिवेगात एक बिबट्या शिकारीचा पाठलाग करीत असताना बिबट्याकडून शिकार निसटली. मात्र, बिबट्याची नेमकी झेप त्या महिलेच्या डोक्यावरच पडली. त्यात ती महिला जखमी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक पी.के. खोकले, वनसेवक किसन केदार व साहेबराव पारधी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेस त्वरेने ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्रथमोपचार केले व पुढील उपचारासाठी महिलेस औंध पुणे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ओतूर व परिसरात बिबट्याचा १ महिन्यात तिसरा हल्ला असून बिबट्याचा वाढता वावर ही एक चिंतेची बाब बनली आहे. नागरिकांनी रात्रीच्या सुमारास विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त असून उघड्यावर झोपणे, एकट्याने बाहेर पडणे कटाक्षाने टाळावे, परिसरात पुरेसा उजेड ठेवण्यासाठी लाइटची व्यवस्था करावी, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे. घटनेनंतर लागलीच उंब्रज पांध परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.