पंतप्रधानांच्या रद्द दौऱ्याचाही राजकीय विषय; विरोधक आक्रमक, मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी
By राजू इनामदार | Published: September 26, 2024 03:29 PM2024-09-26T15:29:24+5:302024-09-26T15:30:04+5:30
जिल्हा न्यायालयापासून मंडई पुढे थेट स्वारगेट पर्यंत या मार्गाचे सर्व काम सुरू झाले असले तर तो त्वरीत सुरू करावा असे मेट्रोच्या नियमित प्रवाशांचे म्हणणे आहे
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रद्द दौऱ्याचाही शहरात राजकीय विषय झाला आहे. त्यांच्या हस्ते सुरू होणारा मेट्रो मार्ग आता पुणेकरमेट्रो प्रवाशांसाठी त्वरीत सुरू करावा अशी मागणी विरोधातील राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. काँग्रेससह आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका स्विकारली असून भारतीय जनता पक्षाला बचावात्मक भूमिकेत येणे भाग पडले आहे.
गाजावजा करत जाहीर केलेला पंतप्रधान मोदी यांचा दौरा पावसाच्या दाट शक्यतेमुळे रद्द करावा लागला. त्यावर आता राजकीय टिकाटिपणी सुरू झाली आहे. काँग्रेसने आधीच एकाच प्रकल्पाचे किती वेळा उद्घाटन करणार म्हणून दौऱ्याआधीच टिका केली होती. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मेट्रो मार्गाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान किती वेळा पुण्यात आले होते त्याची यादीच जाहीर केली. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेला हा दौरा रद्द झाला ते बरेच झाले, रस्ते बंद केल्याने होणारी पुणेकरांची वाहतूक कोंडी वाचली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महामेट्रो प्रशासनाने आता जाहीर केलेला मेट्रो मार्ग त्वरीत सुरू करून पुणेकर मेट्रो प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
दुसरीकडे आम आदमी पार्टीनेही (आप) पंतप्रधान नसले म्हणून काय झाले, हजारो कोटी रूपयांची मालमत्ता विनावापर किती दिवस पडून ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुणेकरांनी मेट्रो ला दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन महामेट्रोने आता जिल्हा न्यायालय ते स्वारगेट, व्हाया मंडई हा मार्ग सुरू करावा असे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर सर्वसामान्य प्रवाशांना बरोबर घेऊन या मार्गाचे उदघाटन करू असा इशाराही आप ने दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनाधिकार सेनेचे राज्य अध्यक्ष हेमंत संभूस यांनी एका व्यक्तीच्या दौऱ्यासाठी सरकारी यंत्रणेने असा कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यावर टीका केली आहे. पुणेकरांची दररोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मेट्रोचा प्रकल्प सुरू झाला. तो आता पूर्ण झाला आहे तर सरकारने पुणेकरांसाठी तो त्वरीत सुरू करावी अशी मागणी संभूस यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाची शहर शाखा मात्र या रद्द दौऱ्याने बचावात्मक भूमिकेत आली आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून नैसर्गिक आपत्तीपुढे कोणाचेच काही चालत नाही असे म्हटले आहे. लवकरच पंतप्रधानाच्या दौऱ्याचे नव्याने नियोजन करण्यात येईल व या मार्गाचे उदघाटन होईल, पुणेकरांनी त्याची खात्री बाळगावी असे आवाहन घाटे यांनी केले आहे.
या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या सर्वसामान्य प्रवाशांचे मत मात्र जिल्हा न्यायालय ते मंडई हा मार्ग त्वरीत सुरू करावा असेच आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मूळ मार्ग आहे. तो सध्या जिल्हा न्यायालयापर्यंतच सुरू आहे. तिथून पुढे थेट स्वारगेट पर्यंत व्हाया मंडई हा मार्ग पंतप्रधानांच्या हस्ते सुरू होणार होता. त्याचे सर्व काम सुरू झाले आहे तर तो त्वरीत सुरू करावा असेच मेट्रोच्या नियमीत प्रवाशांचे म्हणणे आहे.