काटेवाडी : देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो हि काय साधी सुधी गोष्ट आहे का, काटेवाडीचा चमत्कार त्यांना कळाला. ते कुठेही गेले की माझ्यावर बोलतात. राज्यात घेतलेल्या १८ सभांमध्ये शरद पवार हा एकच विषय होता. इथुन पुढच्या निवडणुकीत त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे. त्यांनी लक्ष ठेवले टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टोला लगावला.
काटेवाडी येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, निवडणुकीत काही ठिकाणी पैशाचे वाटप झाले असे म्हणतात. खरे खोट माहीत नाही. मागच्या गोष्टी काढायच्या न काढता काम करीत राहायचं. देशात लोकशाही आहे .पण इथे हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता. पण तुमच्या शहाणपाणामुळे देशातील लोकशाही टिकली. जगात भारताच्या लोकशाहीचा सर्वसामान्यांमुळे नावलाैकीक झाल्याचे पवार यांनी नमुद केले. प्रचाराचा नारळ कन्हेरीत फोडल्यावर सगळ्या निवडणुकीत मला यश आल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. देशात कोठेही गेलो तरी बारामतीचीच चर्चा कानावर होती. मात्र, बारामतीकर साथ सोडणार नाहीत, अस माझ मन मला सांगत होतं. तेच खरे झाले, असे पवार म्हणाले. ऊसाला भाव कसा मिळत नाही, दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत. हे सगळ बघतो. मला बघण्याचा फार अनुभव असल्याची मिश्कील टीपणी पवार यांनी यावेळी केली.
....‘छत्रपती’च्या निवडणुकीत शरद पवार घालणार लक्ष
यावेळी पवार यांनी छत्रपती कारखान्याकडे देखील लक्ष वेधले. ते म्हणाले, आप्पा साहेब कारखाना चांगला चालवत होते. कारखाना आता चांगला चालत नाही. कोण मार्गदर्शन करते हे बघावे लागले. आता कारखानदारी नीट करावी लागेल. कारखाना तुमच्या संसाराचा विषय आहे. एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळतातं. तो कारखाना आता ताब्यात घ्यायचा. छत्रपती एक नंबर चा कारखाना शेवट नंबर ला गेला. त्यात दुरुस्ती करायची असल्याने यासाठी तुमची गरज आहे,अशा शब्दात आगामी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.
आजचा दिवस माझ्या लक्षात राहणारा दिवस आहे. काटेवाडी गावात चौथी पर्यत माझं शिक्षण इथे झालं. शाळेत वाघमारे नावाचे मास्तर होते. शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस होता. तेव्हा आमची आई गुरे घेऊन पाठवायची. तो दिवस आजही मला आठवतो, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सत्तेचा वापर लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करायचा असतो, ही शिकवण मला यशवंतराव चव्हाण यांनी दिली. त्यावाटेने जात असल्याचे पवार यांनी नमुद केले.