पुणे: गुरूवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळचे सव्वा सात झाले तरी अजूनही सुरूच आहे. श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळाने दुपारी ४ ते सायंकाळी ८ या वेळात लक्ष्मी रस्ता पार केला. मात्र त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. आता बहुधा मिरवणूक पूर्ण व्हायला नेहमी इतकाच वेळ लागेल अशी चिन्हे आहेत.
रात्री १२ वाजता बंद झालेले ध्वनीक्षेपक शुक्रवारी सकाळी बरोबर ६ वाजता सुरू झाले. त्यानंतर पून्हा एकदा लक्ष्मी रस्ता डीजेच्या दणदणाटात घुमू लागला. पोलिसांनी विनंती करूनही मंडळांचे पदाधिकारी खेळ दाखवल्याशिवाय पुढे जायला तयार नव्हते. अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश अलका चौक पार झाल्यावर भाविकांच्या गर्दीचा पूर एकदम ओसरला. कार्यकर्त्यांची गर्दी मात्र कायम होती.
सकाळपासून लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या चारही रस्त्यावरून मिरवणुका सुरु आहेत. सर्वत्र मोठे मोठे डीजे लावल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून मंडळांना लवकरात लवकर पुढे जाण्याचे आवाहनही केले जात आहे. परंतु मंडळांची संख्या जास्त असल्याने ते शक्य होत नाहीये. तसेच मंडळातील कार्यकर्तेही मिरवणूक पुढे घेऊन जाण्यास विलंब करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. यंदाही मागच्या वर्षीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.