- शैलेश काटे इंदापूर : बहुचर्चित 'अविनाश धनवे खून प्रकरणा'तील फिर्यादी व अविनाशची पत्नी पुजा धनवे हिने, पोलीस यंत्रणा आरोपीना संरक्षण देत असल्याचा आरोप करत इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वतला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पुजा ही आपल्या काही नातलगांसमवेत इंदापूरला आली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तिने 'पोलीस योग्य प्रकारे तपास करीत नाहीत.. माझा पती हा कोयता गॅंगचा मोरक्या नव्हता.मात्र वर्तमानपत्रांनी तसे चित्र तयार केले आहे. अविनाशचे मारेकरी दिवसाढवळ्या उघड फिरत आहेत.आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत.पोलीस मात्र गप्प आहेत. ते आरोपींना संरक्षण देत आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणाच्या हातून मरण्यासाठ आम्अही इथेच जीव देतो',अशा आशयाचे वक्तव्य करत सोबत आणलेल्या बाटलीतील ज्वालाग्राही पदार्थ अंगावर ओतून घेतला.उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
गेल्या शनिवारी (दि.१६) रात्री आठ वाजता येथील हॉटेल जगदंब मध्ये जेवणासाठी आलेल्या अविनाश धनवेचा गोळ्या घालून व कोयत्याने वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्यासह अकरा जणांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. चार जणांना अटक ही केली आहे.