नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर महामार्ग विस्तारीकरण करीत असताना कामथडी गावाच्या हद्दीतील माणगंगा नदीवरील नवीनपुलाचे काम सुरू होते. जुन्या पुलाचा कठड्या शेजारील संरक्षक भिंत कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र यावेळी कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
माणगंगा नदीवरील विस्तारीत पुलाचे काम सुरू असताना सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान पाऊस सुरू होता. त्यामुळे तेथे काम करीत असलेले कामगार थोड्या वेळा करीता बाजूला थांबले होते. त्यावेळी या विस्तारीत जुन्या पुलाची नदीलगतची संरक्षक भिंत कोसळली. मात्र यावेळी बांधकाम करीता लागणारी सर्व मशिनरी तेथे होत्या. गेले काही महिने या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे.
यावेळी झालेल्या घटनेमुळे या पुलाच्या पडलेल्या संरक्षक भितीच्या बाजूची वाहतुक थांबवून अर्ध्या पुलावरून वाहतूक सुरळीत रहावी. याकरीता वाहतूक वापरातील अर्धा पुलावरील वाहतूक तात्पुरते संरक्षक कठडे उभे करून सुरू ठेवण्यात आली होती. माणगंगा नदीवरील हा पूल महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून असल्यामुळे त्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे; या पुलाची संरक्षक भिंत पडू नये याकरीता महामार्गावरील ठेकेदार कंपनीने अभियांत्रिकी पद्धत न वापरता साध्या पद्धतीने उपाय योजना करून न हे काम केल्याचे तेथील नागरीक वाल्हेकर यांनी सांगितले.
पुणे - सातारा महामार्गावर अवजड वाहनांची अविरत वर्दळ असल्यामुळे पुलाला हादरे बसत असतात. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने वेळीच लक्ष घालून अपघाताचा धोका टाळावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या जीर्ण पुलाची अभियांत्रिकी तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची गरज आहे; अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.