वानवडी : पुणे महापालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाढत्या लोकसंख्येसमोर महापालिका हतबल ठरत आहे. त्यामुळे नव्या महानगरपालिकेची गरज आहे, असे बहुतांश स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, नवीन महापालिकेच्या बाबतीत सर्वांनी एकत्रित येऊन विचार करायला हवा आणि सामूहिक सहमतीतून याेग्य ताे निर्णय घ्यायला हवा,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
वानवडीतील ‘महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवनमध्ये सातारा जिल्हा मित्रमंडळ यांचा सुवर्ण महोत्सव पार पडला. याप्रसंगी सातारा जिल्हा मित्रमंडळ स्मरणिका प्रकाशन, अजिंक्यतारा आणि कृष्णा व कोयनामाई पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शरद पवार वानवडीमध्ये आले हाेते. दरम्यान त्यांनी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यादरम्यान झालेल्या चर्चेदरम्यान पवार बाेलत हाेते.
सातारा जिल्हा मित्रमंडळच्या सुवर्णमहाेत्सवानिमित्त पवार यांच्या हस्ते यशवंत साळुंखे यांना ‘अजिंक्यतारा पुरस्कारा’ने आणि आदिती गोपीचंद स्वामी यांना ‘कृष्णा-कोयनामाई’ हा पुरस्कार सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे - पाटील, माजी आमदार महादेव बाबर आदींसह सातारा जिल्हा मित्रमंडळाचे पदाधिकारी व सातारा जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.
सर्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व सातारा जिल्ह्यातच : पवार
राज्यात जेवढे जिल्हे आहेत त्यांपैकी महाराष्ट्राचा लढा असो अथवा इंग्रजांचा सातारकर अग्रेसर होते. माझे वाडवडील सातारा जिल्ह्यातीलच. प्रामुख्याने कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे याच जिल्ह्यात पाहायला मिळाले, हे विसरून जमणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.
हडपसर मतदारसंघ काॅंग्रेसला द्यावा!
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा यावेळी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा. शेवटची संधी बाळासाहेब शिवरकरांना मिळावी, असा आग्रह व मागणी हडपसर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शरद पवार व श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटावर आपण मात केलेली आहे. मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यामध्ये आरक्षणावरून जो वाद सुरू आहे. यामध्ये पवार साहेब आपण मध्यस्थी करावी, अशी विनंतीही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे यावेळी केली.