पुणे : शहरामध्ये जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली होती, परंतु, जुलै महिना सुरू झाला आणि वरुणराजाने कृपा केली. मंगळवारी (दि.२) सकाळपासूनच जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर हलक्या ते मध्यम सरींमुळे शहरात दिवसभरात १२.६ मिमी पाऊस झाला. या महिन्यात पुणे शहर व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मॉन्सून दाखल झाल्यापासून पुणे शहरात जोरदार पाऊस झाला नव्हता. पण, जूनअखेर पावसाने जोर पकडला आणि सरासरीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला. आता जुलै महिन्यातदेखील पावसाने चांगली सुरुवात केली आहे. या महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. शहरात मंगळवारी सकाळपासून आकाश ढगांनी भरून आले होते. त्यानंतर संततधार सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा होता की, काही मिनिटांमध्ये रस्त्यावरून पाणी वाहत होते. हा जोर अर्धा तासच पाहायला मिळाला. त्यानंतर दुपारी सूर्यनारायणाने दर्शन दिले. ऊन-पावसाचा खेळ पुणेकरांना अनुभवायला आला. दरम्यान, लोणावळा, ताम्हिणी, भीमाशंकर या घाट माथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. लोणावळ्यात गेल्या सोमवारी २४ तासांमध्ये १३६ मिमी पावसाची नोंद झाली, तर मंगळवारी ४.५ मिमी पाऊस झाला.
शहरातील मंगळवारचा पाऊस
शिवाजीनगर : १२.५ मिमी
लवासा : २४ मिमी
माळीण : १९.५ मिमी
हवेली : १७.५ मिमी
पाषाण : १५.४ मिमी
खेड : १४.५ मिमी
वडगावशेरी : १२.० मिमी
बारामती : ११ मिमी
लोणावळा : ४.५ मिमी
तळेगाव : ४ मिमी
दौंड : ४ मिमी
मगरपट्टा : ४ मिमी
चिंचवड : ३ मिमी
राजगुरूनगर : ३ मिमी
नारायणगाव : ३ मिमी
पुरंदर : २ मिमी
बालेवाडी : १.५ मिमी
एनडीए : ०.५ मिमी
कोरेगाव पार्क : ०.५ मिमी
हडपसर : ०.५ मिमी