पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे. भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न आहे तसेच असून, त्यांना जाणीवपूर्वक परीघाबाहेर ठेवले जात आहे. मूलभूत गरजांपासून भटक्या विमुक्तांना वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी आहे, असा आरोप जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी केला.
निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटके विमुक्त महिला हक्क परिषदेचे उदघाटन मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी पाटकर बोलत होत्या.
पाटकर म्हणाल्या, समाजाच्या बाहेर ठेवणं, परिघावर ठेवणं, गुन्हेगार ठरवणं हे भटके विमुक्तांवर ऐतिहासिक अन्याय झाले आहेत, त्यांची स्थिती ही हत्या भोगणारी परिस्थिती आहे. राज्यघटनेतील समता, न्याय, स्वातंत्र्य हे हक्क नाकारले जात आहेत. समाजामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे वंचित, शोषित, पीडित आणि जाणीवपूर्वक वगळलेले असल्याचे दिसते. राज्यघटनेनुसार भटक्या विमुक्तांना समान हक्क देण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. आपल्या हक्कांसाठी दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना लढावे लागत आहे. हात जोडून भीक मागण्यांसाठी नाही तर मूठ आवळून हक्क मिळवण्यासाठी भटके विमुक्तांचा लढा हा माणूस म्हणून जगण्यासाठी असायला हवा. हा लढा स्वबळाच्या आधारावर पुढे नेला पाहिजे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर पारधी समाजाच्या लोकांना ताब्यात घेतले जाते. त्यामुळे गुन्हेगार जमात असा शिक्का असल्याने त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना अजूनही आहे. ती काढून टाकणे हा अस्मितेचा प्रश्न आहे. भटक्या विमुक्तांना परीघाबाहेर ठेवण्याचे काम केले जात आहे. भटक्या विमुक्तांच्या शिफारसीचे काय झाले याविषयी माहिती अधिकारातून माहिती मिळविण्याची गरज आहे. भटक्या विमुक्तांना मूलभूत सुविधांपासून दूर ठेवणारा समाज आणि शासन हेच खरे अपराधी आहेत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.