किमया बोराळकर
पुणे : रयतेच्या स्वराज्याची पहिली कल्पना राजमाता जिजाऊंनीच केली. फक्त कल्पनाच केली नाही, तर शिवबांच्या माध्यमातून ती प्रत्यक्षात आणली. त्यामुळे रयतेच्या स्वराज्याच्या खऱ्या कर्त्या, नेत्या राजमाता जिजाऊच आहेत, असं नव तरुणाई सांगत आहे.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ‘लाेकमत’च्या प्रतिनिधीने लाल महालात आलेल्या तरुणाईबरोबर संवाद साधला असता, अनेक मुलींनी वरील मत व्यक्त केले. एरवी इतिहासाबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या मुलींना जिजाऊंची मात्र बरीच माहिती असल्याचे यावरून दिसते. त्यातही पुन्हा लाल महाल म्हटला की जिजाऊच त्यांच्यासमोर येतात. इथेच बाल शिवबांची पावले जिजाऊंच्या साक्षीने उमटली, शिवबांचे राजकीय शिक्षण खुद्द जिजाऊंच्याच उपस्थितीत झाले.
लाल महालाच्या जागेत महापालिकेने आता नवी वास्तू उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या तावडीतून लाल महाल मुक्त केला, या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम शिवाजी महाराजांनी याच लाल महालात केला, असे तरुणाई सांगत आहे.
''आजचा समाज स्त्रियांच्याबाबतीत पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून बघत आलेला आहे. अशावेळी स्त्रीने जिजाऊंचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे. खऱ्याअर्थाने समानता प्रस्थापित करण्यासाठी जिजाऊंच्या कार्याकडे बघता येईल. जिजाऊंनी शिवबांना घडवले याबरोबरच त्यांच्यात नेतृत्व करणारी स्त्री दडलेली होती. शालेय अभ्यासक्रमात हा इतिहास येणे गरजेचे आहे. तरच पुढच्या पिढीपर्यंत इतिहासाचा हा अमूल्य ठेवा पोहोचवता येईल. - अश्विनी पाटील, पर्यटक.''
''जिजाऊ ही एक अशी स्त्री होती जिने दोन छत्रपती घडवले. आज आपण म्हणतो, महिला राजकारणात प्रवेश करत आहेत; पण महिलांच्या राजकारणाची खरी सुरुवात त्या काळात माॅं जिजाऊंनीच केली. मुलींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. - प्राची दुधाने, कार्यकर्त्या.''