पुणे : पुण्याच्या नांदेड सिटी भागात मधुवंती सोसायटीमधून सुरक्षारक्षकांचाच मुजोरीपणा समोर आला आहे. सोसायटीतच राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. ४२ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पती आणि २ मुलांसह (एक मुलगा आणि एक मुलगी) नांदेड सिटी मध्ये असलेल्या मधुवंती सोसायटी मध्ये गेल्या १० वर्षांपासून राहत आहेत. फिर्यादी यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता त्यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्याठिकाणी नांदेडसिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले. तेव्हा फिर्यादी हे त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेऊन गेटवर गेले. यावेळी गेट वर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला तर त्याचे सुद्धा त्याठिकाणी जमा झालेल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाले. या भांडणामध्ये ८- १० सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले. आणि सुरक्षारक्षकांविरुद्ध तक्रार केली.
सुरक्षारक्षकच झाले भक्षक
सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षरक्षकांची नेमणूक केली जाते. नागरिकांना ये जा करताना काही अडचण येऊ नये. अथवा बाहेरून येणाऱ्या लोकांच्या चौकशीसाठी हे सुरक्षारक्षक तैनात असतात. परंतु त्यांच्याकडूनच नागरिकांना मारहाण होत असल्याने सुरक्षारक्षकच भक्षक झाल्याची चर्चा सोयायटीत होऊ लागली आहे. जवळपास ८ ते १० सुरक्षारक्षकांडून एका तरुणाला मारहाण करणे हे अत्यंत चुकीचं असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.