पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघातून महायुतीतील बंडखोरी थंड झाली आहे. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसच्या आबा बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीला या मतदार संघातून आपला उमेदवार निवडून आणण्याचे आधीच आव्हान होते. त्यातच आबा बागुल यांच्या बंडखोरीने आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे लढत जरी तिरंगी होणार असली तरी फायदा मात्र महायुतीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी माघार घेतल्याने लढत तिरंगी हाेणार असे तूर्त दिसत आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी २०१९ मध्ये ३६,७६७ मतांनी अश्विनी कदम यांचा पराभव केला होता. पण, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. महायुतीकडून भाजपने माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले होते. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. पण, भिमाले यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे माधुरी मिसाळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
माधुरी मिसाळांची हॅट्ट्रिक
पर्वती विधानसभा मतदार संघातून भाजपच्या माधुरी मिसाळ यांची हॅट्ट्रिक झाली आहे. २००९ पासूनच्या निवडणुकीत माधुरी मिसाळ प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आहेत. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी मिळाली होती. परंतु आबा बागुल यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. आघाडीला चुरशीची लढत देण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. तरीही मतदारांच्या हातातच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.