पुणे : जलसंधारणासह आरोग्य, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर कडक ताशेरे ओढत राजकारणाचा स्तर घसरल्याची खंत व्यक्त केली. सत्ताधारी व विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे असून त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाम फाउंडेशनच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात सर्वच राजकीय पक्षांनी जलसंधारणाच्या कामात मदत केल्याचे स्पष्ट केले. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याचे सांगत, सर्वच पक्षांमध्ये माझे मित्र असल्याचे पाटेकर यांनी यावेळी सांगितले. मात्र, सध्या राजकारणाचा स्तर खालावला असल्याची खंत व्यक्त करत पूर्वीचे राजकारणाचे दिवस छान होते, ते आता का नाहीत, असा सवाल केला. सत्ताधारी व विरोधक यांचे नाते जीभ व दात असे असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या. ज्या दिवशी हे साध्य होईल, त्या दिवशी राजकारणाचा स्तर उंचावलेला असेल असेही ते सांगण्यासही ते विसरले नाहीत. सध्याच्या राजकारणाच्या स्तरावर मनात कायमच किंतु-परंतु असतो, असे ते म्हणाले.
वैयक्तिक आयुष्यात अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. मात्र, नाम फाउंडेशनमध्ये काम केल्यानंतर जे समाधान मिळते त्यासारखा मोठा सन्मान नाही, अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रात्री झोपताना असणारा आनंद हा वेगळाच असून आपल्या कामामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आले याचे समाधान असल्याचे ते यावेळी म्हणाले.