पुणे - राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुणेकरांना सोमवारी मध्यरात्री चांगलंच झोडपलं आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठेला नदीचे स्वरुप आले होते. तर दगडूशेठ गणपती मंदिरातही पाणी साठलं होतं. येथील कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत मंदिरातील पाणी बाहेर काढण्याचं काम केलं. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीचा मोठा प्रवाह वाहत होता. या प्रवाहात काही ठिकाणी गाड्याही वाहिल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. एकूणच पुण्यातील पावसाने पुणेकरांची झोप उडाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक भाग पाणी शिरलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे, शेती पिकांचेही नुकसान झाल्याचे समजते. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड, अग्निशमन केंद्र समोर हडपसर, गाडीतळ या भागात चांगलंच पाणी साचलं होतं. तर, काही भागात झाडेही उन्मळून पडली आहेत.
पुण्यातील पावसाचे व्हिडिओ आणि फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्यासोबतच, पडत्या पावसात एकमेकांच्या मदतीला येणारे पुणेकरही दिसून आले. एकंदरीतच पुण्याचा रात्रीचा पाऊस यंदाच्या पावासाळ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस झाल्याचं समजत आहे.
दरम्यान, शिवाजीनगर परिसरात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.कोंढवा खुर्द भाजी मंडई येथे एका ठिकाणी पाण्यात 7 नागरिक अडकले होते. यामध्ये 5 मोठे नागरिक आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. त्यांना रश्शीच्या साह्यानं सुखरुप बाहेर काढलं आहे. मंगळवार पेठेतही पाणी शिरलं होतं. सदाआनंदनगरमधून पाच जणांना सुखरुन बाहरे काढलं आहे. यामध्ये 3 लहान मुली 1 महिला 1 पुरुष होते.