पुणे : नदी पुनरुज्जीवनाबाबत घाई-गडबड करुन चालणार नाही. कारण एक तर पुणेकर विनाकारण रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू पहावी लागेल. त्यासाठी पुढील आठवड्यात पालिका आयुक्त, जलसंपदा विभाग आणि पुणेकर नागरिक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली.
चंदननगर परिसरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांना मुठा नदी आणि वेताळ टेकडीच्या विरोधात पुणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मला खासदार वंदना चव्हाण यांनी टेकडी बचावचे नागरिक भेटले होते. त्यांनी मला दोन-अडीच तास द्यावेत अशी विनंती केली. त्यात ते सर्व प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. तसेच नदीचे पात्र अरूंद होणार आहे. ते पाहिले पाहिजे. कारण धरणातील पाणी, पूर स्थिती आल्यानंतरचा साठा आणि नदीपात्रात पडणारे पावसाचे पाणी असे सर्व गोळाबेरीज करून चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्त, जलसंपदा विभाग आणि पुणेकर नागरिक यांच्याशी येत्या आठवड्यात बैठक घेणार आहोत. त्यात सर्व विषयांवर चर्चा करू. कारण मला माहित आहे की, पुणेकर कधीच विनाकारण असे एवढ्या प्रमाणावर रस्त्यावर येत नाहीत. त्यांचे काही तरी कारण आहे. ते जाणून घेऊ.''
दोन दिवसांपूर्वी वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, प्रदीप घुमरे, डॉ. सुषमा दाते, सारंग यादवडकर, अमेय जगताप आदी पवारांशी भेटले होते. या विषयाची सर्व माहिती पवारांना दिली होती. त्यानंतर लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन पवारांनी दिले होते.