पुणे : नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आणून १९ वर्षांच्या नेपाळी तरुणीला बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. फरासखाना पोलिसांनी या महिलेची कुंटणखान्यातून सुटका केली आहे. विशेष म्हणजे काही काळ पुण्यात राहिलेल्या तिच्या आत्यानेच तिला बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय केल्यास चांगले पैसे मिळतात, असे सांगितल्याचे समाेर आले आहे.
याबाबत पोलिसांनी कुंटणखाना मालकीण रिटा बीरबहाद्दूर तमांग (रा. डायमंड बिल्डिंग, बुधवार पेठ) व तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, डायमंड बिल्डिंगमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत तेथून एका १९ वर्षांच्या तरुणीची सुटका केली. तिला मोडके तोडके हिंदी येत होते. नेपाळी सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिच्याशी संवाद साधला. ती मूळची नेपाळची राहणारी असून, तिच्या आत्यानेच पुण्यात नोकरी मिळेल, असे सांगून सुमारे एक महिन्यापूर्वी पुण्यात पाठविले.
तिने पुण्यात नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु भाषेची अडचण व कमी शिक्षणामुळे कोठेही नोकरी मिळाली नाही. तिच्याकडील पैसे संपले. तिने गावाला आत्याला फोन करून हकीकत कळविली. पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने बुधवार पेठ भागात राहून वेश्या व्यवसाय केला तर चांगले पैसे भेटतील, असे सांगितले. तिच्या ओळखीच्या रिटा तमांग हिचा पत्ता दिला. त्यानुसार ही तरुणी तमांग यांना भेटली. त्यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर ती तेथे थांबली. त्याच दिवशी पोलिसांनी छापा टाकून या तरुणीची सुटका केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे अधिक तपास करीत आहेत.