चांदणी चौकातील रस्त्यांचे काम पूर्ण! शनिवारी उद्घाटन, पाहा ड्रोन VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:01 PM2023-08-10T14:01:12+5:302023-08-10T14:01:47+5:30
उद्घाटनानंतर मार्ग वाहतुकीस खुला होणार...
पुणे : भूसंपादनासह अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शनिवारी (दि. १२) केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार असून, यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी या कामाला १ मे, १५ जुलै असा मुहूर्त मिळाला होता. या चौकातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले. त्यामुळे हे काम रखडले. त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील कोंडीत अडकावे लागले. शिंदे यांनी या कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर यशस्वीपणे मात करत हे काम पूर्ण झाले.
पालिकेला भूसंपादनासाठी सुमारे ४०० कोटी तसेच प्रत्यक्षात उड्डाणपूल उभारण्यासह अन्य रस्त्यांची कामे करण्यासाठी ४६० कोटी असे सुमारे ८६० कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी आला आहे. गडकरी यांनी यापूर्वी याचे उद्घाटन १ मे रोजी होईल, असे जाहीर केले होते. मात्र, तो मुहूर्त हुकल्यानंतर १५ जुलै हा दिवस जाहीर केला. आता या पुलाचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. याचा ड्रोन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील ट्विटर लिंकवर क्लिक करा-
Chandani chowk flyover is finally ready! 😌 Union minister Nitin Gadkari to inaugurate the flyover on August 12. CM Eknath Shinde will also be present.
— Pune City Life (@PuneCityLife) August 9, 2023
Nearly 1.5 lakh people cross this chowk everyday in Pune. Old bridge was built in 1992 by State PWD!
pic.twitter.com/Kfhp595siY