पुणे : वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायांखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका केली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे आहेत. मात्र त्यांचेच नाव असलेल्या एका व्यक्तीने वडगाव शेरीतून उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सुरेंद्र पठारे बोलत होते.
सुरेंद्र पठारे म्हणाले की, श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या बापू बबन पठारे या व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंधरा मिनिटे शिल्लक असताना आपला अर्ज दाखल केला. विरोधातील उमेदवाराचा भाऊ या डमी उमेदवाराला घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आला होता. दरम्यान, या बाबतीत आता निवडणूक आयोगाकडून दुजाभाव केला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने जाहीर केले. मात्र बापू बबन पठारे यांचे ॲफिडेव्हिट अद्यापही जाहीर केलेले नाही. या डमी उमेदवारांनी घेतलेल्या कर्जाची नोंद नाही, त्याच्या नावे किती मालमत्ता आहे, बँक बॅलन्स किती? याचीदेखील माहिती निवडणूक आयोगाने दिलेली नाही. खरे तर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे. मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत. कुठल्याही नियमांचे पालन न करणाऱ्या बापू बबन पठारे या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा.