- प्रकाश गायकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी अद्ययावत कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे शक्य होणार आहे. तसेच वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठीदेखील पोलीस व महापालिका प्रशासनाला मदत होणार आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या संथ कारभाराचा शहरवासीयांच्या सुरक्षेच्या उद्देशाला फटका बसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम सुरू असूनही अद्याप ते पूर्णत्वाकडे गेलेले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेवरून शहरातील हिंजवडी व चाकण या परिसरामध्येदेखील कॅमेरे बसवण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने याला हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार शहरामध्ये ३ हजार ३२५ कॅमेरे बसवण्यात येणार आहे. हिंजवडीचा खर्च एमआयडीसी व हिंजवडी असोसिएशन देणार आहे. तर चाकणचा खर्च शासन देणार आहे. शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू होऊन तब्बल तीन वर्ष उलटली आहेत. मात्र अद्याप हे काम स्मार्ट सिटीला पूर्ण करता आले नाही.समन्वयाच्या अभावाने कामांत अडथळे...स्मार्ट सिटीच्या वतीने शहरामध्ये इनडोअर २७० आणि आउटडोअर १,१११ असे १,३८१ कॅमेरे बसवण्यात आले आहे. स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या विविध एजन्सीमध्ये समन्वय नसल्याने कामामध्ये अडथळे येत आहेत. तर तांत्रिक यंत्रसामग्री जोडणी, इंटरनेट व विद्युत जोडणी न झाल्याने अनेक ठिकाणचे कॅमेरे सुरू झाले नाहीत. तसेच काही ठिकाणी जागा निश्चितीवरूनदेखील वाद आहेत. त्यामुळेही या कामाला विलंब होत आहे. परिणामी संपूर्ण शहरावर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून वॉच ठेवण्याची संकल्पना अद्याप सत्यात उतरली नाही.कमांड अँड कंट्रोल सेंटर कागदावर...शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. एकूण १ हजार १०० कॅमेरे महापालिकेने बसविले आहेत. काही कॅमेरे आमदार निधीतूनही उभारले आहेत. नगरसेवक, स्वयंसेवी संस्था व नागरिकांची मागणी वाढत वाढली आहे. तब्बल १० हजार कॅमेरे बसविण्याची मागणी आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, स्मार्ट सिटी अंतर्गत कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यान्वित नसल्याने सीसीटीव्ही वॉच ठेवणे अशक्य झाले आहे.
कॅमेऱ्यांसाठी ३३ कोटींचा खर्चकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेमार्फत स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये ‘एरिया बेस डेव्हलपमेंट’ (एबीडी) आणि ‘पॅन सिटी सोल्युशन’ या दोन घटकांचा समावेश असून त्याअंतर्गत एकूण १३७८ कोटी ५६ लाख रुपये रकमेच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामध्ये शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ३३ कोटी ६४ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
शहरातील काही ठिकाणी फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय कॅमेरे सुरू करता येणार नाहीत. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जात आहे. जुलै २०२३ पर्यंत स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण केली जातील.- नीळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी.