पुणे : सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. यात ९१२ टपाली मतांचा समावेश आहे. केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी सुरू करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आघाडी घेता आली नाही, मात्र पवार यांना केवळ इंदापूर विधानसभा मतदारसंघात ५२६ मतांची आघाडी मिळाली. अन्य विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली.
दुसऱ्या फेरीमध्ये भोर व खडकवासला या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळाली. मात्र, अन्य मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी त्यांना मागे टाकले. तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सुनेत्रा पवार यांना खडकवासला मतदारसंघात कमी-अधिक मतांनी आघाडी मिळवता आली. मात्र, अन्य मतदारसंघात सुळे यांनी त्यांना पिछाडीवर ढकलले. चौथ्या फेरीअखेर १९ हजार ९४७ मतांनी सुळे आघाडीवर होत्या.
आठव्या फेरीअखेर ३१ हजार ६६१ मताधिक्य
पाचव्या फेरीपासून सुळे यांची आघाडीची घोडदौड चोविसाव्या फेरीअखेर कायम राहिली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा यांच्या मदतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना सुरुवातीपासूनच मताधिक्य मिळण्यात यश आल्याचे मतदारसंघनिहाय उपलब्ध मतांच्या आकडेवारीवरून दिसून आले. पाचव्या फेरीनंतर मताधिक्य वाढत जाऊन सातव्या फेरीअखेर सुळे यांना २ लाख २७ हजार ६५१ मते मिळाली. तर पवार यांना २ लाख २ हजार ५२१ इतकी मते मिळाली. आठव्या फेरीअखेर सुळे यांनी ३१ हजार ६६१ मताधिक्य मिळवले.
साेळाव्या फेरीअखेर ९३ हजारांची आघाडी
दहाव्या फेरीत सुळे यांनी ४८ हजार ३६५ इतक्या मतांची आघाडी घेतली, तर एकूण मते ३ लाख २५ हजार ७२१ मिळवली. त्यानंतरही सुळे यांची घोडदौड रोखण्यात पवार यांना यश आले नाही, तर पवार यांना २ लाख ७७ हजार ७८४ मते मिळाली. अकराव्या फेरीत सुळे यांना ५ हजार ३६२ मतांची आघाडी मिळाली. मात्र, खडकवासला मतदारसंघात पवार यांना ३ हजार ३९६ मताधिक्य मिळाले, हेच मताधिक्य १२ व्या फेरीत १ हजार २५३ तर १३ व्या फेरीत २ हजार ६२२, १४ व्या फेरीत तर ४ हजार २८० मते सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जास्त मिळाली. त्यामुळे सुळे यांची आघाडी १४ व्या फेरीअखेर ७३ हजार ६३१ इतकी झाली. त्यानंतर पुढील दोन फेऱ्यांनी सुळे यांचे मताधिक्य आणखी वाढून ९३ हजार ८२८ इतके झाले.
१ लाख ५२ हजार ९६० मतांनी झाला विजय
सुळे यांनी १७ व्या फेरीत १ लाखांची निर्णायकी आघाडी घेतली. याच फेरीत त्यांना खडकवासला मतदारसंघातही मताधिक्य मिळाले. १८ व्या फेरीत १० हजार ७३४ मतांची आघाडी घेत एकूण मताधिक्य १ लाख १९ हजार २२४ इतके झाले. २० व्या फेरीत १ लाख ३४ हजार २१४ तर २३ व्या फेरीत ही आघाडी दीड लाखाच्या पुढे गेली. या फेरीत सुळे यांना एकूण ७ लाख २४ हजार ९५५ मते मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७२ हजार ७४५ मते मिळाली. एकूण आघाडी १ लाख ५१ हजार ६२८ इतकी झाली. २४ व्या फेरीत केवळ खडकवासला मतदारसंघातील मतमोजणी शिल्लक होती. त्यात सुळे यांनी १ हजार ४२० मतांची आघाडी घेतली. सुळे यांना एकूण ७ लाख २८ हजार ६८ मते तर पवार यांना ५ लाख ७४ हजार ५३८ मते मिळाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी एकूण १ लाख ५३ हजार ४८ मतांची आघाडी घेतली. त्यापूर्वी टपाली मतदानातून सुळे यांना ९१२ मते मिळाली. त्यामुळे सुळे यांचा १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय झाला. पवार यांना ५८८ टपाली मते मिळाली.
ईव्हीएमवर पिपाणी; नाव दिलेले तुतारी
बारामती लोकसभा मतदारसंघात सोहेल खान यांना तुतारी हेच चिन्ह मिळाले होते, प्रत्यक्षात चित्रामध्ये ही बँड पथकातील पिपाणी होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या चिन्हाला तुतारी असेच नाव दिले होते. त्यामुळे मतदारांचा संभ्रम झाला आणि हीच तुतारी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. सोहेल खान यांना एकूण ७ हजार ७९८ मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावरील महेश भागवत यांना ५ हजार ९०६ मते मिळाली.