गजानन हगवणे -
काटेवाडी (जि. पुणे) : बारामती येथे विसावा घेतल्यानंतर बुधवारी सकाळी सणसरच्या (ता. इंदापूर) दिशेने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने प्रस्थान केले. यावेळी वाटेवर काटेवाडी येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.काटेवाडीत आगमन झाल्यानंतर परीट समाजाच्यावतीने अंथरलेल्या धोतराच्या पायघड्यांवरून पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावच्या वेशीपासून ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरुन दर्शन मंडपात नेली. परीट समाज बांधवांच्यावतीने स्वागतासाठी पांढऱ्या शुभ्र धोतराच्या पायघड्या अंथरल्या. श्री छत्रपती हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक स्वागत करताना अग्रस्थानी होते. वाद्याच्या गजरात दुपारी बाराच्यादरम्यान पालखी ओटा येथे सोहळा दुपारी विसावला. यावेळी दर्शन मंडपात दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर दुपारी ३ वाजता पालखी रथात आणण्यात आली. यावेळी बारामती-इंदापूर रस्त्यावर संभाजी काळे, तात्यासाहेब मासाळ, महारनवर यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. यावेळी भाविकांनी श्री ज्ञानदेव तुकारामाचा गजर केला.
...तेव्हापासून मेंढ्यांच्या रिंगणाची परंपरा- संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. - पूर्वीच्या काळात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळांनी मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते. - तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे.